अमरावती: ३ जुलै- आदिवासी विकास परिषदेचे प्रदेश युवा अध्यक्ष लकी जाधव यांच्या नेतृत्वात आदिवासी बांधवांनी अमरावती जिल्ह्यातील धारणी येथील आ. राजकुमार पटेल यांच्या संपर्क कार्यालयासमोर धडक दिली. यावेळी जाधव यांनी आमदार पटेल निष्क्रिय आहे, असा आरोप केला., तेव्हा पटेल समर्थकांनी आक्षेप घेतल्याने वाद वाढला. आदिवासी विकास परिषदेने आपल्या निवेदनात आमदार पटेल समस्यांचे समाधान करू शकलेले नाही, असा स्पष्ट आरोप केला असल्याने परिषद व राजकुमार पटेल समर्थक आमने-सामने येण्याची शक्यता नाकारता येत नाही. पटेल दारू पिऊन असतात, या जाधवांच्या विधानामुळे पटेल समर्थक प्रचंड संतप्त आहेत. आमदारांचा अपमान करणाऱ्याविरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी समर्थकांनी केलेली आहे, तर आमदारांना जबाबदारीची जाणीव करुन देण्यासाठी परिषदेतर्फे उलगुलान आंदोलन सुरू करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. याविषयावर मेळघाटात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.
आदिवासी विकास परिषदेने उलगुलान आंदोलनांतर्गत आमदार पटेल यांना निवेदन दिले. आमदार दारू पिऊन असतात. ते कसा विकास करु शकतात, या विधानावर आमदार समर्थक भडकले व त्यांनी पोलिस ठाण्याकडे धाव घेतली. पोलिस निरीक्षक सुरेंद्र बेलखेडे यांना जाधवांची व्हिडीओ क्लिप दाखविण्यात आली. यावेळी प्रकाश घाडगे, विशाल खार्वे, वृषभ घाडगे, गोपू चौथमल, डॉ. शैलेश जिराफे, टिंकू पटेल, रुपेश भारती, अभिषेक राठौड, छोटू देशमुख, गोमन राठौड यांच्यासह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. या विषयी बोलताना आमदार राजकुमार पटेलांनी थोड्याच वेळात ठाण्यात तक्रार दाखल करण्याचा मानस व्यक्त केला.