मुंबई, ३ जुलै- प्रसिद्ध अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव विभक्त झाले आहेत . दोघांनी देखील एकमेकांच्या सहमतीने घटस्फोट घेतला असून, स्वत: आमिर खानने आज शानिवारी घटस्फोटाची माहिती दिली आहे. आमिर खानचा हा दुसरा घटस्फोट आहे. आमिर खान आणि किरण रावने अधिकृतरित्या एक निवेदन जारी करत विभक्त झाल्याची घोषणा केली आहे.
आमिर खान आणि किरण राव १५ वर्षांपूर्वी लग्न बंधनात अडकले होते. दोघांनीही आझाद नावाचा एक मुलगा आहे. आमिर आणि किरण निवेदनात म्हणतात की १५ वर्षांच्या सुंदर संसारात आम्ही हसत-खेळत प्रत्येक क्षण घालवला आहे. यादरम्यान आमचं नातं विश्वास आणि सन्मानाने पुढे जात राहिलं. आता आम्ही आमच्या आयुष्याचा नवा अध्याय सुरु करत आहोत. जिथे आम्ही पती-पत्नी नसून फक्त आमच्या मुलाचे पालक असू आणि कुटुंबाचे एक भाग असू. काही दिवसांपूर्वीच आम्ही विभक्त होण्याचा निर्णय घेतला होता. आता आम्ही वेगवेगळे राहण्यात समाधानी आहोत. आझादसाठी आम्ही त्याचे पालक असून त्याचा उत्तमपणे सांभाळ करू.
‘लगान’ सिनेमाच्या सेटवर आमिर खान आणि किरण रावची पहिली भेट झाली होती. किरण राव या सिनेमासाठी सहाय्यक म्हणून काम करत होती. काही वेळ एकत्र घालवल्यानंतर आमिर आणि किरणने २८ डिसेंबर २००५ सालामध्ये लग्नगाठ बांधली होती. तर २०११ मध्ये सरोगसीच्या मदतीने मुलगा आझादचा जन्म झाला होता.
किरण रावशी आमिर खानचं हे दुसरं लग्न होतं. या आधी २००२ सालामध्ये आमिर आणि अभिनेत्री रीना दत्त विवाहबंधनात अडकले होते. १६ वर्षांनी आमिरने रीनाला घटस्फोट दिला होता. रीना आणि आमिरला दोन मुलं आहेत.