मुंबई : ३ जुलै – अभिनेता दिनो मोरिया याच्यावर सक्तवसुली संचलनालयाने केलेल्या कारवाईनंतर भाजप आमदार नितेश राणे शिवसेनेविरोधात प्रचंड आक्रमक झाले आहेत. दिनो मोरिया हा मुंबई महानगरपालिकेतील सचिन वाझे होता. याप्रकरणात आणखी खोलवर गेल्यास अनेक ‘पेंग्विन’ बाहेर पडतील. आमच्याकडे सगळ्याचे पुरावे आहेत, असा दावा नितेश राणे यांनी केला.
नितेश राणे यांनी शनिवारी ट्विट करुन यासंदर्भात भाष्य केले. यावेळी त्यांनी दिनो मोरिया प्रकरणावरुन शिवसेनेला लक्ष्य केले. बॉलिवूडमध्ये चार-पाच चित्रपट करण्यापलीकडे दिनो मोरियाची विशेष ओळख नाही. मात्र, हा दिनो मोरिया मुंबई महानगरपालिकेशी संबंधित कोणतेही काम चुटकीसरशी करुन देऊ, असे इतरांना सांगत फिरतो. दिनो मोरियाची कोणाशी मैत्री आहे?, असा सवाल नितेश यांनी उपस्थित केला.
संदेसरा घोटाळा प्रकरणात अंमलबजावणी संचलनालयाने अभिनेता दिनो मोरिया आणि अहमद पटेल यांचा जावई इरफान अहमद सिद्दिकी या दोघांवर मोठी कारवाई केली आहे. ईडीने या दोघांची अनुक्रमे 1.4 कोटी आणि 2.41 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. गुजरातमधील उद्योजक संदेसरा बंधूंनी तब्बल 14500 कोटी रुपयांचे कर्ज घेऊन एका बँकांना चुना लावला होता. याप्रकरणाच्या तपासादरम्यान इरफान सिद्दीकी आणि दिनो मोरिया यांचेही आर्थिक लागेबांधे असल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे ‘ईडी’कडून गुन्हेगारी स्वरुपात मोडणाऱ्या आर्थिक व्यवहाराइतक्या रक्कमेची संपत्ती जप्त केल्याचे समजते.