अनिल देशमुखांना ईडीचा तिसरा समन्स

मुंबई,३ जुलै- माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना आज शनिवारी ईडीतर्फे तिसरा समन्स पाठवण्यात आला आहे. ५ जुलै रोजी ईडी समोर चौकशीला राहण्याचे आदेश या पूर्वीच्या दोन समन्समध्ये देण्यात आले होते. या अगोदर दोन वेळा पाठवण्यात आलेल्या समन्सना देशमुखांनी आपल्या वकिलामार्फत उत्तर दिले आहे. दरम्यान, कायदेशीर सल्ला घेण्यासाठी आणि सर्वोच्य न्यायालयात याचिका दाखल करण्यासाठी अनिल देशमुख दिल्लीला रवाना झाले आहेत. ते राजकीय नेत्यांच्या भेटी घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनिल देशमुख यांच्या दोन्ही खासगी सचिवांना अटक झाल्यानंतर ईडीने आपला मोर्चा अनिल देशमुख यांच्याकडे वळवला. अनिल देशमुख यांना चौकशीसाठी बोलावण्यात आले होते. मात्र, त्यांनी कोरोनाचा काळ आणि वय वाढल्यामुळे चौकशीला हजर राहण्यापासून मुदत मागितली होती.
ईडीकडून माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना दोनदा समन्स बजावला होता. त्यांनी आपण ईडीला सहकार्य करत असल्याचे म्हटलं आहे. त्याबाबत त्यांनी ट्वीट देखील केले आहे.
अनिल देशमुख यांनी त्यांच्या विरोधात सीबीआयने दाखल केलेला गुन्हा रद्द करावा या मागणीसाठी याचिका केली आहे. या याचिकेवर आज शनिवारी सुनावणी झाली. यावेळी अनिल देशमुख यांचे वकील अमित देसाई यानी युक्तिवाद केला, मात्र, त्यांचा युक्तिवाद पूर्ण झाला नाही. त्यामुळे देशमुख यांच्या याचिकेवर आता सोमवारी ५ जुलै रोजी सुनावणी होणार आहे.

Leave a Reply