नागपूर रेल्वे स्थानकावर विदेशी सिगारेटची तस्करी पकडली

नागपूर : २ जुलै – लाखो रुपये किमतीच्या विदेशी सिगारेटची तस्करी आरपीएफच्या पथकाने हाणून पाडली. नागपूर रेल्वेस्थानकाच्या फलाटावर संपूर्ण मुद्देमाल पडून होता. येथून विशाखापट्टणमला हा माल जाणार होता. मात्र सतर्क जवानांनी बारीक लक्ष ठेवून तस्करी उघडकीस आणली. या कारवाईमुळे आरपीएफच्या पथकावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. रेल्वेच्या पार्सल विभागाच्या माध्यमातून देशभरात कुठेही माल पाठविण्याची सोय आहे. माल पाठविण्यासाठी रीतसर नोंदणी करून मालाचे वर्णन तसेच नोंदणी करणारा आणि नियोजित ठिकाणाच्या नावाची नोंदणी करावी लागते. २० लाख ६४ हजार ४०० रुपये किमतीच्या या विदेशी सिगारेटची नोंदणी दिल्ली येथून करण्यात आली. नागपूरला माल उतरविण्यात आला. फलाटावर एकूण ६ बॉक्स उतरविले होते. येथून हा माल विशाखापट्टणमला पाठविण्यात येणार होता. मात्र गस्तीवर असलेले आरक्षक प्रवीण चव्हाण आणि राजेश गडपलवार यांचे लक्ष बेवारस बॉक्सवर गेले. त्यांनी विचारपूस केली. मात्र कोणीही पुढे आले नाही.
या घटनेची माहिती लगेच आरपीएफ निरीक्षक आर. एल. मीणा यांना देण्यात आली. उपनिरीक्षक विनोद खरमाटे यांनी घटनास्थळी जाऊन मुद्देमाल ठाण्यात आणला. बॉक्स उघडल्यानंतर एकूण चार बॉक्समध्ये विदेशी सिगारेट आढळल्या. विदेशी म्हणजे मॅनमारच्या सिगारेट असल्याने हे प्रकरण संवेदनशील होते. चार बॉक्समध्ये १९४ लहान बॉक्स होते. त्यात एक लाख ५८ हजार ८०० सिगारेट मिळाल्या. प्रत्येक बॉक्समध्ये ५०० सिगारेट आहेत. तर उर्वरित दोन बॉक्समध्ये देशी कंपनीच्या १२० सिगारेटचे पॅकेट मिळाले. या मुद्देमालाची qकमत २० लाख ६४ हजार ४०० रुपये आहेत. आरपीएफने कारवाई करीत संपूर्ण मुद्देमाल जप्त केला. पुढील कारवाईसाठी अबकारी विभागाला देण्यात येणार आहे. ही कारवाई मध्य रेल्वेचे विभागीय वरिष्ठ सुरक्षा आयुक्त आशुतोष पांडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Leave a Reply