खोदकामात सापडले लाव्हारसातून तयार झालेले कॉलमनार बेसाल्ट नावाचे दुर्मिळ नैसर्गिक खडक

यवतमाळ : २ जुलै – यवतमाळ जिल्ह्यातील वणीजळील शिबला-पार्डी ह्या गावाजवळ खोदकामात दगडी खांब आढळले आहे. हे खांब ही कोणत्याही ऐतिहासिक काळातील मानव निर्मित वस्तू नसून सहा कोटी वर्षापूर्वी महाराष्ट्रात प्रचंड ज्वालामुखी उद्रेक झाला त्यातील लाव्हारसातून तयार झालेले कॉलमनार बेसाल्ट नावाचे दुर्मिळ नैसर्गिक खडक आहेत. लावारास अचानक पाण्याच्या संपर्कात येऊन थंड झाल्यास आकुंचित पावून षटकोनी आकाराचे खांब तयार झाल्याची माहिती भुशास्त्र आणि खगोल अभ्यासक प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
वणी परिसर हा जसा ऐतिहासिक दृष्ट्याे प्राचीन आहे. तसाच तो भौगोलिक दृष्ट्याक अतिप्राचीन आहे. याच परिसरात २०० कोटी वर्षाची स्ट्रोमेटोलाईटची आणि पूर्वी पांढरकवडा जवळ आणि मारेगाव तालुक्यात ६ कोटी वर्षाची शंख-शिंपल्यांची जीवाश्मे आढळलेली होती. ७ कोटी वर्षापूर्वी पर्यंत विदर्भात समुद्र होता परंतु ६ कोटी वर्षादरम्यान उत्तर क्रीटाशिअस काळात पृथ्वीवर भौगोलिक घडामोडी घडल्या आणि आजच्या पश्चिम घाटातून भेगी उद्रेकाद्वारे तप्त लावारस यवतमाळ जिल्हा आणि मध्य विदर्भा पर्यत वाहात आला. या उद्रेकातून तयार झालेल्या दगडी थरांना दक्खनचे पठार नावाने ओळखले जाते. हा ज्वालामुखी परिसर मध्य भारतात पाच लाख स्क्वेअर किलोमीटर परिसरात आणि पश्चीमेकडे ६६०० फुट जाडीचा आहे. महाराष्ट्रात ८०% हा बेसाल्ट अग्निज खडक असल्याची माहिती प्रा. चोपणे यांनी फिली.
भारतात कर्नाटकात सेंट मेरी बेट हे अशाच कॉलमनार बेसाल्टसाठी पर्यटन स्थळ म्हणून प्रसिद्ध आहे. महाराष्ट्रात मुंबई, कोल्हापूर, नांदेड येथे हे खडक आढळले असून आता त्यात यवतमाळ जिल्ह्याचे नाव समाविष्ट झाले आहे. विदर्भ प्रदेशात या खडकाची जाडी कमी आहे. त्यामुळे गेल्या हजारो वर्षापासून भूक्षरण होऊन प्राचीन खडक उघडे पडत असून अनेक नव्या जीवाश्माचे संशोधन होऊ शकणार आहे. वणी परिसरात तप्त लाव्हारस वाहत आला आणि येथील नदीत पडून तो अचानक थंड झाला. त्यामुळे त्याने आकुंचन होऊन षटकोनी आकार घेतला आणि असे दगडी खांब तयार झाले.

Leave a Reply