उधारी मागण्यासाठी गेलेल्या युवकाची चाकूने वार करून हत्या

भंडारा : २ जुलै – उधारी दिलेले बाराशे रुपये मागण्यांकरिता गेलेल्या युवकाची चाकूने वार करून हत्या करण्यात आली. सदर घटना शहरातील चांदणी चौक येथे आज दुपारच्या सुमारास घडली. हेल्मेट उर्फ विक्की रामचंद्र भुरे (२८) असे मृतकाचे नाव आहे. याप्रकरणी आरोपी महेश तरारे रा. चांदणी चौक याला भंडारा पोलिसांनी ताब्यात घेतले.
हेल्मेटने परिसरातील अनेक युवकांना उधार उसने पैसे दिले होते. हेल्मेटची नास्त्याची दुकान होती. मागील काही महिन्यापासून सततची टाळेबंदी व वेळेच्या मर्यादेमुळे दुकानातून पाहिजे तसे उत्पन्न मिळत नव्हते. त्यामुळे तो आर्थिक तंगीत असल्याने उधारीच्या पैशाकरिता उसने घेणाऱ्यांकडून त्याने पैसाची मागणी सुरू केली. महेश तरारे नामक यानेही हेल्मेट कडून बाराशे रुपये घेतले होते. दरम्यान 1.30 वाजताच्या सुमारास हेल्मेट महेशच्या घरी पैसे मागण्यांकरिता गेला. यावेळी शाब्दीक चकमक झाली. दरम्यान रागाच्या भरात महेशने स्वयंपाक घरातील भाजी कापण्याचा चाकू आणून हेल्मेटचा पोटात खूपसला. पोटावर वार होताच जखमी अवस्थेत हेल्मेटने तेथून पळ काढला. परिसरातील एका मित्राने त्याला तातडीने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले. परंतु येथे हेल्मेटने उपचाराआधीच जीव सोडला. फुफ्फुसाला इजा झाल्याने अधिक रक्तस्त्राव होऊन हेल्मेटचा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले. भंडारा पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी आरोपी महेशला ताब्यात घेऊन गुन्हा दाखल केला. अधिक तपास पोलिस निरीक्षक लोकेश काणसे यांच्या मार्गदर्शनात सुरू आहे.

Leave a Reply