सांगली:१ जुलै- पायी वारी सोहळ्याला परवानगी द्यावी, अशी मागणी शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे गुरूजी यांनी केली आहे. या पार्श्वभूमीवर त्यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनही दिलं आहे. वारी होत नसल्याने कोरोना वाढत आहे. त्यामुळे वारीला परवानगी द्या कोरोना जाईल, अशी मागणी संभाजी भिडे गुरूजी यांनी सांगलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. या मागणीसाठी संभाजी भिडे गुरुजी यांच्या नेतृत्वाखाली वारकरी संप्रदायाचे प्रमुख आणि शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी सांगलीच्या जिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांना निवेदन दिले.
संभाजी भिडे गुरूजी म्हणाले की, वारी झाल्यानंतर देशातलाच नाही, तर जगातला कोरोना आटोक्यात नव्हे, तर नामशेष होईल. संतांच्या परंपरा जपल्या की सर्व विघ्ने नाहीशी होतात, त्यामुळे पायी वारीला परवानगी द्यावी, असं भिडे गुरूजी यांनी म्हटलं आहे.
मानाच्या पालख्यांचे वाहनातून प्रस्थान न करता मर्यादित वारकऱ्यांच्या उपस्थितीत पायी वारी झाली पाहिजे, अशी मागणी भिडे गुरूजी यांनी केली आहे. तसेच दारूच्या दुकानात जाणाऱ्या तरुणांना पोलीस अडवत नाहीत. पण, विनामास्क फिरणाऱ्यांना ५०० रुपये दंड केला जातो, असेही भिडे गुरुजी यांनी सांगितले.