बिबट्याने भरवस्तीत चिमुकलीवर केला हल्ला

चंद्रपूर : १ जुलै – चंद्रपूर तालुक्यातील जंगलव्याप्त जुनोना गावात बिबट्याने धूम ठोकली. गावालगतच्या बेघर वस्तीमध्ये एका ५ वर्षीय चिमुकल्या मुलीवर हल्ला केला. या हल्लयात ती गंभीर जखमी झाली. जखमी मुलींला तात्काळ जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले असून, सद्या तिच्यावर उपचार सुरू आहेत. ही घटना दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. प्राजक्ता मेश्राम असे जखमी मुलीचे नाव आहे.
जुनोना गाव जंगलव्यात असून, येथे वन्यप्राण्यांचा वावर असतो. गावालगत बेघर वस्ती आहे. जखमी मुलीच्या आईसह अन्य एक महिला घरापासून काही अंतरावर फेरफटका मारण्यासाठी गेल्या. दरम्यान, दबा धरुन बसलेल्या बिबट्याने चिमुकल्या मुलीवर हल्ला केला. भयभीत झालेल्या अन्य महिलांनी आरडाओरड केली असता, बिबट जंगल्याच्या दिशेने पळाला. रस्त्याने जाणार्याल नागरिकांनी महिलांची मदत केली. ग्रामस्थांना याबाबतची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळ गाठले. लागलीच वनविभागाला याबाबतची माहिती दिली गेली. ग्रामस्थांनी जखमी मुलीला जिल्हा सामान्य रूग्णालयात हलविले. तिच्यावर सध्या सामान्य रूग्णालयात उपचार सुरू असून, तिच्या गालाला व डोक्याला दुखापत झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी आर. आर. गाडेकर यांनी दिली.
सामान्य रूग्णालयात भेट देवून जखमी मुलीची व तिच्या आईची विचारपूस केली. लागलीच तातडीची आर्थिक मदत देण्यात आली असून, उर्वरित शासकीय मदत दिली जाईल, अशी माहिती गाडेकर यांनी दिली.

Leave a Reply