पडळकरांवरील हल्ला हा भाजपचाच कट – राष्ट्रवादीचा आरोप

अकोला : १ जुलै – भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्या कारवर सोलापुरात झालेल्या दगडफेकीवरून आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. पडळकरांसह भाजप नेत्यांनी या हल्ल्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला जबाबदार धरत जोरदार टीका केली आहे. तर, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे.
‘गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर झालेला हल्ला हा भाजपनं ठरवून केलेला स्टंट आहे. प्रसिद्धीसाठी हे सगळं केलं गेलं आहे. पडळकरांची आजची प्रतिक्रिया मी पाहिली. दलित, उपेक्षित, शोषित, वंचितांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झालाय असं ते म्हणताहेत. पण वंचित आणि शोषितांचे प्रतिनिधी असं लँड रोव्हर किंवा ४०-५० लाखांच्या गाड्या घेऊन फिरत नसतात,’ असा टोला मिटकरी यांनी हाणला आहे. ‘दगडफेक झाली तर धोका आहे असं समजून वाय, झेड सेक्युरिटी मिळेल असं त्यांना वाटत असावं. त्यासाठी भाजपनंच हे सगळं कटकारस्थान केलं असावं. राज्यातल्या जनतेला हे चांगलं माहीत आहे,’ असं मिटकरी म्हणाले.
‘आज कृषी दिन आहे. त्या निमित्तानं पडळकरांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर काम करायला हवं. शेतकऱ्यांच्या बांधावर जायला हवं. वसंतराव नाईकांच्या कामाचा प्रचार करायला हवा. त्याऐवजी, त्यांनी माणसा-माणसांमध्ये भांडणं लावण्याची आरएसएसची मानसिक विकृती जगासमोर आणू नये. अन्यथा, भाजपला तोंड काळं करावं लागेल. भाजपनंही अशा लोकांपासून सावध राहावं,’ असा सल्लाही त्यांनी दिला आहे.
बहुजन संवाद कार्यक्रमांतर्गत गोपीचंद पडळकर हे सोलापूर शहरात सध्या घोंगडी बैठका घेत आहेत. शहरातील मड्डी वस्ती परिसरातील एसबीआय कॉलनी येथे बैठकीला आले असताना त्यांच्या गाडीवर एक दगड भिरकावण्यात आला. त्यात गाडीची समोरची काच फुटली. ‘हा हल्ला राष्ट्रवादी काँग्रेसच्या लोकांनीच केला असून प्रस्थापितांचा बहुजनांवर हल्ला आहे,’ असं पडळकर या घटनेवर बोलताना म्हणाले होते. आमदार अमोल मिटकरी यांनी पडळकरांना खोचक शब्दांत प्रत्युत्तर दिलं आहे.

Leave a Reply