केंद्र सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क केले कमी

नवी दिल्ली: १ जुलै – केंद्र सरकारने कच्च्या पाम तेलावरील आयात शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने कच्च्या पाम तेलाचे आयात शुल्क १० टक्के करण्याची घोषणा आज गुरुवारी केली. काही दिवसांपूर्वी जागतिक बाजारपेठेतून स्थानिक बाजारपेठेत आवक वाढत असल्याने खाद्यतेलांच्या दरात घट झाली होती. आता केंद्र सरकारने कच्च्या पाम तेलावरील शुल्क कमी करण्याचा निर्णय घेतल्याने लवकरच खाद्यतेल स्वस्त होणार आहे.
वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर, ग्राहकांना दिलासा देण्यासाठी केंद्र सरकारने कच्च्या पाम तेलावरील शुल्क आकारणीत पाच टक्क्यांनी कपात केली. कच्चे खाद्यतेल आणि शुद्ध पाम तेलाच्या आंतरराष्ट्रीय किमतींमध्ये गेल्या एक महिन्यापासून किंमतींमध्ये घसरण दिसून येत आहे. खाद्य तेलाच्या वाढत्या किंमतींमुळे ग्राहकांचे हित लक्षात घेता सरकारने कच्च्या पाम तेलावरील शुल्क कमी केले आहे, असे ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाने एका निवेदनात म्हटले आहे.
दरम्यान, खाद्यतेलांच्या दरात सातत्याने वाढ होत होती. चांगल्या मोहरी आणि रिफाइंड तेलाच्या किंमतींनी प्रतिलिटर २०० रुपयांचा आकडा गाठला आहे.

Leave a Reply