अनिल देशमुखांच्या स्वीय सहाय्यकांच्या कोठडीत ५ दिवसांची वाढ

मुंबई : १ जुलै – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक कुंदन शिंदे आणि स्वीय सचिव संजीव पलांडे यांच्या ईडी कोठडीत स्पेशल पीएमएलए कोर्टाने आणखी पाच दिवस वाढ केली आहे. त्यामुळे आता या दोघांना ६ जुलैपर्यंत ईडी कोठडी असणार आहे. या आधी कुंदन शिंदे आणि संजीव पलांडे यांना न्यायालयाने १ जुलैपर्यंत कोठडी सुनावली होती.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या शंभर कोटींच्या आरोपांचा तपास करत असलेल्या सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) २५ जून रोजी दिवसभर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या कार्यालये आणि घरांवर धाडी टाकल्या होत्या. तसेच त्यानंतर त्यांच्या स्वीय सहाय्यक आणि स्वीय सचिवांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं होतं.
काळा पैसा आणि १०० कोटींच्या वसुली प्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती. त्याशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागानेही त्यांच्या घरी छापे टाकले होते. पुन्हा ईडीने छापे टाकल्याने देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू आहे.

Leave a Reply