भंडारा: ३० जून- स्वतंत्र विदर्भ राज्याची त्वरित निर्मिती व्हावी, कोरोना काळातील संपूर्ण वीज बिल सरकारने भरावे व पेट्रोल-डिझेल-गॅसची दरवाढ त्वरीत मागे घ्यावी यासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती तर्फे ९ ऑगस्टला विदर्भ चंडिका मंदीर, शहीद चौक, नागपूर येथे बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनाला संपूर्ण विदर्भातून हजारो विदर्भवादी ठिय्या आंदोलनात सामील होणार आहे. ९ ऑगस्टला विदर्भ चंडिका देवीला साकडे घालून महाआरती करून दुपारी १ वाजता ठिय्या आंदोलनाला सुरुवात होईल, अशी माहिती विदर्भ राज्य आंदोलन समितीचे राम नेवले यांनी दिली.
कोरोना महामारीमुळे उद्योग, व्यापार, व्यवसाय बंद झाल्यामुळे रोजगार नाही, क्रयशक्ती संपली म्हणून कोरोना काळातील वीज बिल राज्य सरकारने भरावे व २00 युनिट वीज मोफत करून नंतरचे वीज दर निम्मे करावे. पेट्रोल-डिझेल-गॅसचे दर प्रचंड वाढल्यामुळे सामान्य जनतेचे आर्थिक गणितच बिघडले आहे. या किमती त्वरीत मागे घ्याव्या. ९ ऑगस्ट क्रांती दिवसापासून सुरू होणारे ठिय्या आंदोलन विदर्भस्तरीय आहे. भाजपच्या केंद्र सरकारने विदर्भ न दिल्यास आंदोलन अधिक तीव्र करण्यात येईल, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी रंजना मामर्डे, मुकेश मासूरकर, देविदास लांजेवार, मनीषा पुंडे, प्रिया शहरे, आशा भोंगाडे, लता बावनमुखे, भाऊराव बनसोड, कृष्णराव सपाटे, नवृत्ती सहारे आदी उपस्थित होते.