स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध मागण्यांसाठी संविधान चौकात केले आंदोलन

नागपूर : ३० जून- स्पर्धा परीक्षार्थींच्या विविध प्रश्नांवर राज्य सरकार गंभीर नसल्याचा आरोप करीत, स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडियाच्या वतीने संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. यावेळी महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे रखडलेल्या भरतीप्रक्रिया सुरू करणे, आयोगातील सदस्य नेमणुका करणे अशा विविध मागण्या करण्यात आल्या.
करोनाची दुसरी लाट नियंत्रणात येताच शासनाने राज्यातील सर्व व्यवहार सुरू केले. मात्र, अनेक वर्षांपासून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा विचार होताना दिसत नाही. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शासनाविरोधात असंतोष वाढत चालला आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची सदस्य संख्या सहा असायला हवी. परंतु मागील तीन वर्षांपासून दोनच सदस्य डोलारा सांभाळत आहेत. येत्या १० दिवसांत संपूर्ण सदस्य नियुक्त करावेत, आयोगाच्या रखडलेल्या सर्व परीक्षा लवकर घ्याव्या, स्थापत्य अभियांत्रिकी सेवा परीक्षेच्या ३६०० विद्यार्थ्यांच्या मुलाखती त्वरित घ्याव्यात, रखडलेल्या ४१३ अधिकाऱ्यांना नियुक्त्या द्याव्यात, मागील ३ वर्षांपासून पोलीस भरती झालीच नाही, येत्या १० दिवसांत पोलीस भरतीची आणि सरळसेवा व मेगाभारतीसाठी अधिसूचना जारी करावी, राज्य सरकारच्या वर्ग ३ व ४ च्या सर्व परीक्षा एमपीएससीमार्फत घ्याव्यात, या मागण्यांकरिता हे आंदोलन करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी शासनाच्या विरोधात घोषणाबाजी केली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन पाठवण्यात आले. स्टुडंट राईट असोसिएशन ऑफ इंडियाचे उमेश कार्राम यांच्या नेतृत्वात झालेल्या या आंदोलनाला नितेश कराडे, वैभव बावनकर, अतुल खोब्रागडे आदी विद्यार्थी उपस्थित होते.

Leave a Reply