वृद्ध कलावंत मानधन समिती त्वरित बरखास्त करा – ज्येष्ठ कवी विष्णू सोळंके यांची मागणी

अमरावती: ३० जून- वृद्ध कलावंत मानधन समितीत केवळ राजकीय व्यक्तींची निवड करण्यात आल्यामुळे ही समिती आता कलावंतांची राहिलेली नसून, राजकीय पुढाऱ्यांची समिती झालेली आहे. त्यामुळे ही समिती त्वरित बरखास्त करण्यात यावी, अशी मागणी ज्येष्ठ कवी विष्णू सोळंके यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून केली आहे.
महाराष्ट्र राज्यातील जिल्हा परिषदेच्यावतीने वृद्ध कलावंत मानधन समिती स्थापन करण्यात येते. त्या माध्यमातून वृध्द कलावंतांना मानधन देण्यात येते. मात्र अमरावती जिल्ह्याच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यामध्ये संपूर्ण राजकीय कार्यकर्त्याचा समावेश केल्याचे दिसून येते. वास्तविक, शासकीय नियमानुसार जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिक हा या समितीचा अध्यक्ष असावा, तसेच सदस्य सुद्धा ज्येष्ठ साहित्यिक असावेत, असे परिपत्रकात नमुद केले असूनसुद्धा त्या नियमाचे पालन झाले नसल्यामुळे अमरावती जिल्ह्यातील ज्येष्ठ साहित्यिकांचा तो एकप्रकारे अपमान आहे, असे या पत्रात म्हटले आहे.
या समितीवर प्रामुख्याने नियुक्त केलेल्या नवीन सदस्यांमध्ये दिलीप बालाजी काळबांडे यांची अध्यक्ष म्हणून नियुक्ती केल्याचे दिसून येते. ते तिवसा येथील पंचायत समितीचे माजी सभापती असून, सदस्य म्हणून छोटु महाराज (वसु) हे अमरावती जिल्हा प्रहार या संघटनेचे सद्य स्थितीत अध्यक्ष आहेत. दिलीप जानराव वऱ्हाडे यांचासुद्धा समावेश असून ते एका पक्षाचे माजी नगरसेवक होते.
या समितीचे अवलोकन केले असता पालकमंत्र्यांनी विविध पक्षांच्या कार्यकर्त्यांना या समितीत स्थान दिल्यामुळे ते परिपत्रकानुसार चुकीचे असल्यामुळे ही समिती बरखास्त करावी, अशी मागणी सोळंके यांनी केली आहे.

Leave a Reply