विदर्भात पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्याबाबत पेट्रोलियम मंत्र्यांचा सकारात्मक प्रतिसाद

नागपूर:३० जून- विदर्भात पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यााठी आठ वर्षांपासून पाठपुरावा करणाऱ्या ‘वेद’ (विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिल) या विदर्भातील उद्योजकांच्या संघटनेच्या आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना अखेर यश आले आहे. नागपूरजवळ पेट्रोकेमिकल प्रकल्प उभारण्यासाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे आदेश केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांनी अधिकाऱ्यांना दिले.
बैठकीनंतर देवेंद्र फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ही चर्चा अतिशय सकारात्मक झाली. तांत्रिक व्यवहार्यता अहवालही सकारात्मकच येईल. या प्रकल्पामुळे विदर्भात अनेक नवे उद्योग येतील, गुंतवणूक आणि रोजगार वाढण्यासाठी सुद्धा त्यामुळे मोठी मदत होईल. विदर्भात पेट्रोकेमिकल्सचा प्रकल्प व्हावा, यासाठी वेद मागील आठ वर्षांपासून प्रयत्न करीत आहे.
देवेंद्र फडणवीस यांच्यापुढे विदर्भ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट कौन्सिलच्यावतीने नुकतेच प्रकल्पाचे सादरीकरण करण्यात आले होते. त्याचवेळी फडणवीस यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री धर्मेद्र प्रधान यांना दूरध्वनी करून या प्रकल्पाबाबत चर्चाही केली होती. फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली वेदचे अध्यक्ष शिवकुमार राव, उपाध्यक्ष प्रदीप माहेश्वरी, कोषाध्यक्ष नवीन मालेवार व पेट्रोकेमिकल रिफायनरीच्या क्षेत्रातील तज्ज्ञ विनायक मराठे यांच्यासह खासदार अशोक नेते यांनी नवी दिल्लीत र्धमेद्र प्रधान यांची भेट घेतली. त्यांच्यापुढे प्रकल्पाचे सादरीकरणही करण्यात आले. त्याला प्रतिसाद देत प्रधान यांनी प्रकल्पासाठी तांत्रिक व्यवहार्यता अहवाल तयार करण्याचे आदेश अधिकाऱ्यांना दिले आहेत.

Leave a Reply