अमरावती : ३० जून – अमरावती तालुक्यात अनेक भागात वादळासह पाऊस कोसळत असताना पारडी गावात वाऱ्यामुळे वडाच्या झाडाची फांदी तुटून विद्युत तारांवर कोसळली. यामुळे स्पार्किंग होऊन जिवंत तारा तुटल्या आणि त्या खाली पडताच त्याच्या संपर्कात आलेल्या एकूण एकोणवीस (१९) जनावरांचा घटनास्थळीच मृत्यू झाला आहे. मंगळवारी (काल) रात्री घडलेल्या या घटनेने पारडी गावात खळबळ उडाली आहे.
जिल्ह्यात सध्या पेरणीचा हंगाम सुरू आहे. पेरणीसाठी पारंपरिक पद्धतीने गो वंशाचा उपयोग करण्यात येतो. जिल्ह्यात सध्या ढगाळ वातावरण असताना मंगळवारी दुपारच्या सुमारास काही भागात सोसाट्याचा वारा व पाऊस झाला. वादळामुळे पारडी गावात अनेक घरांवरिल छप्पर उडून गेलेत. पारडी येथे वडाच्या वृक्षाची मोठी फांदी विद्युत तारावर कोसळली. यामुळे परिसरात मोठ्या स्पार्किंगचा आवाज आला. त्याच वेळेस पाऊस सुरू होता. अशातच तुटलेल्या तारांच्या संपर्कात आलेले एकोणवीस (१९) जनावर दगावल्याने पेरणीच्या हंगामात शेतकर्यां ना मोठा आर्थिक फटका बसला आहे. दगवलेल्या जनावरांमध्ये 9 गाई आणि 10 म्हशीचा समावेश आहे.
बडनेरा मतदारसंघात येणाऱ्या पारडी गावातील ज्या शेतकऱ्यांची जनावरे दगावली, त्यांना तातडीने आर्थिक मदत मिळावी, अशी मागणी आमदार रवी राणा यांनी प्रशासनाकडे केली आहे.