‘या’ कारणांसाठी करायची आहे अनिल देशमुखांची चौकशी – ईडीच्या वकिलांची न्यायालयात माहिती

मुंबई: ३० जून- १०० कोटी वसुली प्रकरणामुळे राष्ट्रवादीचे नेते आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख अडचणीत सापडले आहेत. ईडीला सहा प्रकरणांमध्ये अनिल देशमुख यांची चौकशी करायची आहे. अनिल देशमुख यांची चौकशी का करायची आहे याबद्दल ईडीचे वकील इंद्रपाल सिंग यांनी न्यायालयात माहिती दिली.
अनिल देशमुख यांच्याकडे असलेली मालमत्ता, नातेवाईकांच्या नावावर असलेली जंगम व स्थापवर मालमत्ता, पाच वर्षांचा आयकर परतावा, नागपुरातील श्री साई शिक्षण संस्थेचा सविस्तर तपशील आणि मागील पाच वर्षात जमा झालेले देणगी आणि निधी किती याची चौकशी ईडीला करायची आहे. तसंच, अनिल देशमुख यांचे खासगी सचिव संजीव पालांडे, स्वीय सहायक कुंदन शिंदे यांच्यामध्ये काय संवाद झाला, आर्थिक व्यवहाराची तपशील काय आहे, याबद्दलही माहिती जाणून घ्यायची आहे, अशी भूमिका ईडीने स्पष्ट केली.
दरम्यान, खुद्द अनिल देशमुख यांनी ईडीला पत्र लिहून सात दिवसांची मुदत मागितली आहे. आपलं वय आणि कोरोनाची परिस्थिती असल्यामुळे चौकशीला हजर न राहण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती देशमुख यांनी ईडीकडे केली आहे. तर, दुसरीकडे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मंगळवारी संध्याकाळी बैठक पार पडली. या बैठकीनंतर राष्ट्रवादीची स्वतंत्र बैठक झाली. याबैठकीत अनिल देशमुख यांच्याबद्दल चर्चा झाल्याची माहिती समोर आली आहे.
सध्या ईडीमुळे सत्ताधारी महाविकास आघाडीमध्ये खळबळ उडाली आहे. राष्ट्रवादीचे नेते केंद्रीय तपास यंत्रणेवर विनाकारण त्रास देण्याचा आरोप करत आहेत. अनिल देशमुख यांना ईडीने समन्स बजावला आहे. त्यामुळे त्यांच्या अटकेची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply