नवी दिल्ली : ३० जून – गेल्या कित्येक दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर संयम आणि शांततेने सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनात आज पुन्हा एकदा हिंसाचार बघायला मिळाला. दिल्लीच्या गाझीपूर सीमेवर आंदोलक शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठी झटापट झाली. या झटापटीत काही शेतकरी जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे. गाझीपूर सीमेवर एका भाजप नेत्याच्या स्वागतासाठी भाजप कार्यकर्ते आले होते. मात्र, तिथे ते पोहोचले तेव्हा मोठा गदारोळ सुरु झाला, अशी प्राथमिक माहिती समोर आली आहे. या प्रकरणावरुन शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजपवर प्रचंड हल्लाबोल केला आहे. “भाजप नेते आमच्या मंचावर आले होते. त्यांच्या स्वगतासाठी त्यांचे कार्यकर्तेही आले होते. हे चुकीचं आहे”, असं राकेश टिकैत म्हणाले
केंद्र सरकारच्या तीन कृषी कायद्यांविरोधात पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचं जवळपास 8 महिन्यांपेक्षा अधिक काळापासून आंदोलन सुरु आहे. या आठ महिन्याच्या काळात शेतकरी आंदोलनाला अनेक वळणं आली. पण हे आंदोलन आजही सुरुच आहे. 2021 चा प्रजासत्ताक दिवस ज्यादिवशी दिल्लीत शेतकरी आंदोलकांनी ट्रॅक्टर रॅली काढली त्यादिवशी प्रचंड हिंसा बघायला मिळाली. शेतकरी आणि पोलीस आमनेसामने आले. अनेक पोलीस जखमी झाले. पण त्यानंतर शेतकरी आंदोलनात हिंसाचार झाल्याची बातमी समोर आली नाही.
मात्र, पाच महिन्यांनी पुन्हा शेतकरी आंदोलनात हिंसाचार बघायला मिळाला. यावेळी तर थेट भाजप आणि शेतकरी यांच्यात हिंसाचार बघायला मिळाला. गाझीपूरच्या सीमेवर जो भाजप नेता आला होता त्याची गाडी घटनास्थळापासून दूर नेण्यासाठी प्रचंड खटाटोप करावा लागला. विशेष म्हणजे भाजप कार्यकर्त्यांच्या हातातही लाठ्या-काठ्या होत्या, असा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे.
गाझीपूर बॉर्डरवर शेतकरी आणि भाजप कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या हिंसाचारावरुन शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी भाजपला धमकी दिली आहे. आमच्या मंचावर कोणत्याही पक्षाचा झेंडा लावून ताबा मिळवण्याचा प्रयत्न केला तर त्यांचा योग्य इलाज करु. हो मी धमकी देतोय. आमच्या मंचावर ताबा मिळवून स्वागताचा कार्यक्रम करणं योग्य नाही. विशेष म्हणजे भाजप नेते पोलिसांच्या उपस्थितीत आमच्यावर ताबा मिळवण्याचा प्रयत्न करत आहे. तुम्हाला जर मंच एवढा आवडत असेल तर आंदोलनात सहभागी व्हा, असं राकेश टिकैत म्हणाले.
आमचा मंच रस्त्यावर आहे याचा अर्थ असा नाही की थेट मंचावर यायचं. मंचावर यायचं असेल तर भाजप सोडून या. पण मंचावर येऊन भाजपने ताबा मिळवत आपला झेंडा फडकवला तर ते चुकीचं आहे. अशा लोकांना उधळून लावू. असे लोक पुन्हा राज्यातही जावू शकणार नाहीत, असंदेखील राकेश टिकैत यावेळी म्हणाले.