नागपूर : २९ जून – स्थानिक स्वराज्य संस्थांसह आगामी सर्व निवडणुका स्वबळावर लढवण्याची घोषणा काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. मात्र अवघ्या काही दिवसात विदर्भातच नाना पटोलेंच्या स्वबळाच्या घोषणेला बगल देण्यात आली आहे. नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढणार आहे.
काँग्रेस प्रदेशाध्यक्षांच्या स्वबळाच्या घोषणेनंतरही नागपुरात काँग्रेस-राष्ट्रवादीने हातात हात धरला आहे. नागपूर जिल्हा परिषदेत दोन्ही पक्ष एकत्र पोटनिवडणूक लढवण्याबाबत शिक्कामोर्तब झालं. दोन्ही पक्षात जागावाटपासाठी सार्वत्रिक निवडणुकीचा फॉर्म्युला वापरण्यात येणार आहे.
भाजप हा आमचा कायम विरोधी पक्ष आहे. शरद पवार भाजपविरोधात मोट बांधत असतील तर चांगली गोष्ट आहे. मात्र, महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, अशी घोषणा नाना पटोले यांनी केली होती. त्यानंतर, तुम्ही स्वबळाचा किंवा एकहाती सत्ता आणण्याचा नारा दिला तर लोक तुम्हाला जोड्याने हाणतील, असा सूचक इशारा शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिला होता.
आगामी काळातील निवडणुका काँग्रेस स्वबळावर लढणार, हा शब्द आम्ही दिला आहे, त्यात कुठल्याही परिस्थितीत माघार नाही, निवडणुकांना अजून तीन वर्षे बाकी आहेत, अशा परिस्थितीत पक्ष संघटन वाढवण्यासाठी प्रयत्न करणे गैर नाही, अशा शब्दात काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी स्वबळाचा पुनरुच्चार केला होता.