आज एका वृत्तवाहिनीने एक बातमी दिली ती बातमी लगेचच समाजमाध्यमांवरून झपाटून व्हायरल झाली, ती बातमी अशी होती की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांच्या घरचा लाडका कुत्रा जेम्स याचे निधन झाले, त्यावेळी राज ठाकरे अतिशय भावुक झाले होते, या जेम्स वर आज परळमधील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले, यावेळी ठाकरे कुटुंबियांसह मनसे नेते आणि पक्षकार्यकर्ते मोठ्या संख्येत उपस्थित होते, असे या बातमीत म्हटले आहे. हा जेम्स राज ठाकरे यांचा खूप लाडका होता, असेही या बातमीत म्हटले आहे. ही बातमी पंचनामाच्या वाचकांसाठी आम्ही आज पोर्टलवर टाकली आहे .
ही बातमी वाचून सुजाण सुज्ञ नागरिकांना व्यंकटेश स्तोत्रातील दोन ओळी आठवतील, त्या ओळी अश्या आहेत, समर्थाचिये घरचे श्वान, त्यासी सर्वही देती मान, म्हणजेच श्रीमंतांच्या घरचे कुत्रेही असले तरी त्याला सर्व मानाने वागवतात, या जेम्सच्या बाबतीतही असेच घडते आहे. कुत्रा हा पाळीव प्राणी आहे,तो घराचे आणि मालकाचे प्रसंगी जीव धोक्यात घालून रक्षण करतो, त्यामुळे घरी पाळलेला कुत्रा हा कुटुंबीयांचा लाडकाच असतो. देशात अनेक राजकीय नेत्यांकडे, उद्योगपतींकडे आणि गर्भश्रीमंतांकडे कधी हौस म्हणून, तर कधी गरज म्हणून कुत्री पाळली जातात. त्यांचे यथायोग्य संगोपन आणि संवर्धनही केले जाते. अश्या कुत्र्याचा वृद्धापकाळामुळे मृत्यू झाल्यास, त्या कुटुंबियांना दुःखही होते. मात्र ही घटना २१व्या शतकात एखाद्या वृत्तवाहिनीची बातमी म्हणून प्रसारित होणे कितपत योग्य आहे? असा प्रश्न उपस्थित होतो. आज समाजमाध्यमांवर अनेक सुजाण नागरिकांनी हाच प्रश्न उपस्थित केला आहे.
आपल्या देशात रस्त्यांवर लाखो बेवारस कुत्री फिरतात, त्यातली अनेक कुत्री कधी वृद्धापकाळामुळे, कधी आजारामुळे, तर कधी भरधाव वाहनाखाली आल्याने चिरडून मृत्युमुखी पडतात. मात्र कोणत्याही माध्यमाने त्याची बातमी बनवल्याचे माझ्या ४५ वर्षाच्या पत्रकारितेत मला दिसून आले नव्हते. मग राज ठाकरेंच्याच कुत्र्याबाबत सदर वृत्तवाहिनीला इतके प्रेम का वाटावे हा प्रश्न निर्माण होतो.
त्याचबरोबर या कुत्र्यावर परळच्या स्मशानभूमीत केलेले अंत्यसंस्कार आणि त्याला पक्षाच्या नेत्यांनी लावलेली हजेरी हा प्रकारही एक प्रकारचे लांगूलचालनच म्हणावे लागेल. या मनसे कार्यकर्त्यांनी रस्त्यावर बेवारस मरून पडल्याने वातावरणात दुर्गंधी पसरवणाऱ्या कुत्र्यांच्या मृतदेहाबद्दल कधी इतकी संवेदनशीलता दाखवल्याचे ऐकिवात नाही. अश्या बेवारस कुत्र्यांच्या मृतदेहांची विल्हेवाट जरी या कार्यकर्त्यांनी लावली तरी ती समाजसेवा ठरू शकते. मात्र आम्हाला ते कधीच करावेसे वाटत नाही.
मोठ्यांचे लांगुलचालन करायचे ही आमच्या देशातील सर्वसामान्यांची परंपरा राहिलेली आहे त्याचेच पालन आज या कार्यकर्त्यांनी केले असे म्हणावे लागेल. त्याचबरोबर या वृत्तवाहिनेही तातडीने दिलेली बातमी हेदेखील लांगूलचालनच म्हणावे लागेल. आज देशात आणि जगात असंख्य घडामोडी घडत आहेत मात्र, त्या बाजूला ठेवत राज ठाकरेंच्या लाडक्या कुत्र्याचा मृत्यू आणि त्याच्यावर झालेले अंत्यसंस्कार ही बातमी त्यांना इतकी महत्वाची का वातावही हा प्रश्नही सदर वाहिनीच्या प्रेक्षकांना पडला आहे. बातमीच्या २४ तास चालणाऱ्या वाहिन्या सुरु झाल्यापासून कोणतीही बातमी उचलायची आणि ती दिवसभर दाखवायची असा पोरकर सुरु झाला आहे. ही कुत्र्याची बातमीदेखील असाच प्रकार म्हणावा लागेल.
एकूणच जे काही घडते ते गंभीरच म्हणावे लागणार आहे. याचा विचार सर्वानीच करायचा आहे.
अविनाश पाठक