मनातल्या मनातले

जगणं हे न्यारं झालं जी

29 june bulbulलॉकडाऊन लागून ४-५ दिवस झाले असतील. सकाळी उठून अंगणात आले तो यांनी खुणेनी हळूच अंगणाच्या कोपऱ्यात बघायला सांगितलं . सकाळी सकाळी काय आता म्हणून बघते तो एक छोट्टासा काळसर गोळा दिसला. निरखून बघितलं तर हलल्यासारखा वाटला . हे म्हणाले अग त्या छोट्याशा पक्षाचं पिल्लू दिसतयं. किती लहान अगदी डोळेसुद्धा उघडले की नाही . आता याचं काय करायचं हा प्रश्नच पडला आम्हा दोघांना ! माणसांनी हात लावला की पक्षी पिल्लाला टाकून देतात असं ऐकलेलं त्यामुळे हात लावायला जीव धजेना. आपण का कारणीभूत व्हायचं ? बरं मांजर आली , कोणाचं लक्ष नसेल आणि पिल्लाला काही झालं तर ? झालं ! आम्ही दोघांनी जवळच पाळण्यावर बसून पाळत ठेवायला सुरवात केली, पेपरवाला आला , त्याच्या हातातून पेपर ओढून घेतला. एरवी अंगणात भिरकावून देतो तो. झाडांना पाणी घालायची पण पंचाईतच आली . हळूहळू बादलीनी घातलं पाणी.
अंगणात प्रवेश करणाऱ्या प्रत्येकाला सावध करुन पिल्ला पासून दूर ठेवायचं कामच सकाळभर पुरलं . हळूहळू ऊन वाढायला लागलं सिमेंटच्या फरशीवर कसं काय व्हायचं ? किती ऊन आहे ! पिल्लाचे आई बाबा सारखे घिरट्या घालतच होते. पिल्लू हळूहळू खुरडत झाडांमधे गेल्यावर जीव भांड्यात पडला. जवळच पाणी ठेवलं . बारीक सोजी, रवा , डाळीचा बारीक भरडा असं काहीबाही ठेवलं .
पण पक्ष्यांचं baby food निराळच असावं आईनी त्याकडे ढूंकूनही बघितलं नाही. पाणी मात्र प्यायची. दुपारभर पिल्लाकडे लक्ष देण्याचं काम मिळालं आम्हा दोघांना. निसर्गाची किमया किती अद्भुत ! पिल्ला भोवती चिमण्या चिवाचिवाट करुन भिरभिरत होत्या. पारव्याच्या जोडीनं तर पिल्लाच्या दोन्ही बाजूला ठाणच मांडलं होतं जणू आईला आश्वस्त करत होते ” जा तू चारा आणायला . आम्ही आहोत इथे” . एक खारीचं पिल्लू आजूबाजूनी गस्त घालत होतं . शेवटी मदतीची भावना सगळ्याच प्राणीमात्रात असते नाही ?
दुसऱ्या दिवशी पिल्लू एक फांदी वर चढलं . जिवाची भिती सगळ्यांनाच असते, ऊन आल्यावर हळूहळू पानांच्या सावलीत सरकण्याचा शहाणपणा जन्मजातच होता . अधून मधून पंख फडफडवून पंखात किती बळ आलं ते बघत होतं .
मांजरीला दूर ठेवण्याचं काम आम्ही दोघंही डोळ्यात तेल घालून करत होतो. मजा म्हणजे मांजरीलाही पिल्लं होणार होती त्यामुळे कुलरखाली गारव्यात झोपली असायची सारखी.
पिल्लू आणि वरच्या फांदीवर चढलं . दिसेना कुठे तेंव्हा काळजाचा ठोकाच चुकला .पण चिवचिवाट करुन त्याने अस्तित्वाची जाणीव करुन दिल्यावर हुश्श्..! झालं . आई चारा द्यायला आली तेंव्हा दिसलं ते. प्राण्यांची पिल्लं लवकरच स्वतंत्र होतात खरी. ३-४ दिवसातच बळ आलं पंखात आणि उंच झाडावर जाऊन बसलं . शोधलं तरी दिसेना. आवाज मात्र देत होतं . आमचं काम संपलं. पिल्लाला पंख फुटली गेलं उडून . मन आशेनी वाट बघत होतं .पिल्लू येईल का पुन्हा ? कित्येक वर्षांनी पुन्हा रितेपणाची भावना आली . आता कुठे दोघांनीच रहायची सवय होत होती तो हा पाश निर्माण झाला. चालायचचं.
लॉकडाऊन मधले हे चार दिवस मंतरल्या सारखे गेले. रोजच्या रटाळ चक्रात थोडे वेगळे. इतक्या वर्षांनी आलेला हा caring चा अनुभव मनाला टवटवी देऊन गेला.
इतक्या दिवसांनी हे लिहण्याचं कारण म्हणजे आता पाळण्या जवळच्या जास्वंदीवर बुलबुलने घरटे बांधून अंडी दिलीत . यापूर्वी दारा समोरच्या वेलीवर बुलबुलनी घरटे केले होते तेंव्हा दारात उभंसुद्धा राहू देत नव्हता. फटकन चोच मारायचा जोरात , कितीतरी दिवस समोरचं दार बंद ठावावं लागलं. नाहीतर छत्री घेऊन निघावं लागायचं .
आता वाटलं पाळण्यावर बसायची सोय नाही .पण आता अंड्यातून पिल्लं निघाली तरी काही करत नाही . पाळण्यावर बसलं की एकदा वरच्या दांड्यावर बसून अंदाज घेतो तेवढच ! बुलबुललाही आमचा विश्वास वाटायला लागला आहे असं वाटतं. चला आयुष्यात एवढं तरी कमावलं म्हणायचं ! आता पुढच्या घडामोडींची वाट . अनलॉक झालेलं असलं तरी अजून बाहेर जाण्याची सोय नाही . एक नवीन कारण मिळालं मन रमवायला , पूजेसाठी फुलं तोडतांना त्या झाडाच्या फुला , फांद्यांना हात लावायचा नाही हे मनाला बजावतो . बुलबुलचा विश्वास गमवायला नको. पिल्लं घरट्यात सुखरुप राहू देत म्हणजे झालं .

” अशी पाखरे येती आणिक स्मृती सोडूनी जाती “
यांचं निरीक्षण करतांना , काळजी घेतांना

    जगणं हे न्यारं झाल जी 
    असच वाटायला लागलयं. 

   सौ. अमृता खोलकुटे

Leave a Reply