मनाचं सात्वन
आयुष्यात कधीही भरकटल्यासारखं वाटलं की आपली पहिली धाव मित्र मैत्रिणींकडे असते. पण मित्र मैत्रिणी आणि नातेवाईक कितीही जवळचे असले तरी ते जवळचे आहेत हाच यातला मोठा अडथळा असतो. आणि आपल्या अडचणीच्या काळात, आपल्या अडचणीच्या पलीकडे बघणे फारसे जमत नाही. त्यामुळे जवळच्या माणसांना आपल्याला सावरण्याची आणि त्यांचं स्वतःचं मन प्रसन्न ठेवण्याची कसरत करावी लागते. अशा वेळी कधी कधी मैत्रीदेखील धोक्यात येते. कारण आपल्या जवळच्या व्यक्तीकडून काही सत्य ऐकण्याची आपली तयारी नसते, आणि कधी कधी त्यांची मतं त्यांच्या आपल्या बरोबर आलेल्या संपर्कातून आणि त्यांच्या बायस मधून तयार झालेली असतात. अशावेळी गरज असते ती कुणीतरी आपलं ऐकून घेण्याची आणि अगदी अलगदपणे आपल्याला आपल्या निर्णयापर्यंत नेण्याची. मग ते निर्णय अतिशय सोपे किंवा प्रचंड अवघड असू शकतात. पण तिथपर्यंत भीती बाजूला ठेऊन पोचायला कौन्सेलरची नक्कीच मदत होते.
दुसऱ्यांची आपल्यापेक्षा मोठी दुःख बघून आपल्या त्रासाला कमी लेखणे देखील योग्य नाही. एखाद्या श्रीमंत माणसाला झाला काय किंवा गरीब माणसाला झाला काय, मनःस्ताप दोघांनाही सारखाच असतो, कारण तो पैसे ओतून कधीही झटकन दूर करता येत नाही. आणि कित्येक मानसिक द्वंद्व अशी असतात जी अशी गणितासारखी सोडवता येत नाहीत.
जेव्हा गाडी प्रेमावर येते तेव्हा मात्र बहुतेक वेळा ह्रदयच बाजी मारून जातं. प्रेमात ह्रदयांचीच देवाणघेवाण होताना दिसते; मग अशा वेळी मन कुठे असते? बहुदा ह्रदयाला स्पंदनाबरोबर वेळ पडली तर दुसर्या ह्रदयात स्थलांतर करण्याची सुद्धा कामगिरी नेमून दिलेली असावी. तरीदेखील, ह्रदय मोजुन मापुन बेफ़ाम होतं. सामान्य अवस्थेत असताना जेवढे ठोके पडत असतील त्यापेक्षा थोडेसे जास्त प्रेमावस्थेत पडत असतील. त्यामुळे मर्यादा सोडून काही ह्रदयाला वागता येत नाही. ह्याउलट, मनाला मर्यादेशी काही घेणंदेण नसत. खर पाहता, समोरची व्यक्ती मनात भरल्यानंतरच ह्रदयाची देवाणघेवाण शक्य आहे. त्यामुळे जोवर मन पसंतीचा “ग्रीन सिग्नल” देत नाही तोवर ह्रदय बापुड्याला काहीच करता येत नाही.
पल्लवी उधोजी