पुण्यातील आंबील ओढा परिसरातील घरे पाडल्याप्रकरणी ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी व्यक्त केला संताप

पुणे : २९ जून – पुण्यातील आंबिल ओढा परिसरातील नागरिकांची अनेक घरांवर बुल्डोजर चालल्यानंतर आज ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी स्थानिक रहिवाशांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी स्थानिकांशी संवाद साधत त्याच्या घरांवर झालेल्या कारवाईची माहिती घेतली. परिसरातील अबालवृद्ध आणि महिलांशी संवाद साधला. दलित महिलांशी करण्यात आलेलं गैरवर्तन ऐकून तीव्र दु:ख झालं, अशी प्रतिक्रिया नितीन राऊत यांनी दिली आहे. इतकंच नाही तर पुणे महापालिका आणि महापौर मुरलीधर मोहोळ यांच्यावरही राऊत यांनी जोरदार निशाणा साधलाय.
आंबिल ओढ्याच्या ठिकाणी घडलेला प्रकार दुर्दैवी, त्याचा निषेध करतो. कोरोना काळात प्रशासनाने जी कारवाई केली त्याबाबत महापालिकेला लाज वाटली पाहिजे होती. एवढं सगळं होत असताना महापौर काय झोपले होते का? नागपुरात जर असं घडलं असतं तर आपण जेसीबीखाली झोपलो असतो, असं आक्रमक मत राऊत यांनी यावेळी व्यक्त केलं. दलित समाजावर अन्याय झाला आहे. घटनेची चौकशी झाली पाहिजे. ज्या लोकांनी आमच्या स्त्रियांना हात लावला त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशी मागणीही राऊत यांनी केलीय.
दरम्यान, स्थानिकांकडून अजित पवार यांच्या जवळच्या बिल्डरकडून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप करत असल्याबाबत पत्राकारांनी नितीन राऊत यांना प्रश्न विचारला. त्यावर मात्र नितीन राऊत यांना उत्तर देता आलं नाही. त्यांनी या संपूर्ण प्रकरणात जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी केलीय.

Leave a Reply