सुरक्षा दलाशी झालेल्या चकमकीत जहाल नक्षलवादी ठार

रायपूर: २८ जून-पाच लाख रुपयांचे इनाम असलेला आणि सुमारे २५ गुन्हेगारी प्रकरणांमध्ये पोलिसांना हवा असलेला एक नक्षलवादी छत्तीसगडच्या दंतेवाडा जिल्ह्य़ात रविवारी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत मारला गेला. ही चकमक पोर्देम येथील जंगलात घडली. जिल्हा राखीव गार्डचे एक पथक नक्षलवाद प्रतिबंधक मोहिमेवर असताना नक्षलवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला. सुरक्षा दलांनी गोळीबार करून त्यांना प्रत्युत्तर दिले. यानंतर घनदाट जंगलाचा फायदा घेऊन नक्षलवादी पळून गेले.
यानंतर सुरक्षा दलांनी या भागात शोध घेतला असता त्यांना पिस्तूल व दैनंदिन उपयोगाच्या इतर वस्तूंसह एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळला. संतोष मरकाम नावाचा हा नक्षलवादी माओवाद्यांच्या मालनगीर एरिया कमिटीचा सदस्य होता. त्याच्यासाठी पाच लाख रुपयांचे इनाम ठेवण्यात आले होते, तसेच त्याच्याविरुद्ध अरणपूर पोलीस ठाण्यात सुमारे २५ फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले होते, असे पोलिसांनी सांगितले.

Leave a Reply