संपादकीय संवाद – विजयभाऊ वडेट्टीवारांनी काँग्रेस संस्कृतीशी जुळवून घेण्यातच त्यांचे हित

मी ओबीसी असल्यामुळे काँग्रेस पक्षानेही माझ्यावर अन्याय केला. मला राज्य मंत्रिमंडळात कमी महत्वाचे पद दिले गेले, असा आरोप ओबीसी नेत्यांच्या परिषदेत बोलताना करुन काँग्रेसचे राज्यातील एक मंत्री विजय वडेट्टीवार यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर विरोधक काँग्रेसवर तुटून पडले आहेत, तर, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना सारवासारव करावी लागली आहे.
विजय वडेट्टीवार हे तसेही राजकारणात आक्रमक वैदर्भीय नेते म्हणूनच ओळखले जातात. त्यांच्या राजकीय कारकीर्दीला सुरुवात झाली, ती शिवसेनेतून. ते शिवसेनेचे चंद्रपूर जिल्ह्यातील आमदार म्हणून विधान परिषदेत गेले होते. नंतर त्यांनी विधानसभेत एण्ट्री घेतली. ते तत्कालीन विरोधी पक्षनेते नारायण राणे यांचे खंदे समर्थक होते. त्यामुळे राणेंनी २००५मध्ये शिवसेना सोडली, तेव्हा त्यांच्याच बरोबर राजीनामे देणाऱ्या आमदारांमध्ये वडेट्टीवार हेही होते.
काँग्रेसमध्ये आल्यावरही त्यांच्यातला शिवसैनिक कायम राहिला. त्यामुळे ते काँग्रेसमध्येही आक्रमकच होते.
काही दिवसांनी ते काँग्रेस संस्कृतीत रुळले. परिणामी, काँग्रेसशी न जमल्याने नारायण राणे जेव्हा काँग्रेसमधूनही बाहेर पडले, तेव्हा त्यांना साथ देणार्यांमध्ये विजयभाऊ नव्हते. त्यांनी काँग्रेस संस्कृतीत राहणेच इष्ट मानले. परिणामी, अजूनही ते काँग्रेसमध्ये आहेत.
काँग्रेसमध्ये विजयभाऊ रुळले खरे, पण, तिथले जाती-पातीचे राजकारण त्यांना जमले नाही. शिवसेनेत बाळासाहेब असेपर्यंत तरी, जाती-पातीचे राजकारण कधीच झाले नाही. माणसाच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवत, बाळासाहेबांनी पदे दिली. त्यामुळेच मनोहर जोशींसारखा ब्राह्मणही मुख्यमंत्री बनू शकला. काँग्रेसमध्ये मात्र, उमेदवारी देण्यापासून प्रत्येक टप्प्यावर जात बघितली जाते.
त्यातही महाराष्ट्राच्या काँग्रेसमध्ये मराठ्यांचे वर्चस्व जास्त आहे. त्यामुळे गैरमराठा व्यक्तीला काँग्रेसमध्ये फारसे पुढे येऊ दिले जात नाही. ही बाब रुचत नसली तरी, पचवून घ्यायला हवी होती. नेमके हेच विजयभाऊंना साधले नाही. त्यातही त्यांनी आपले पहिले गॉडफादर नारायण राणे यांचा पदर पक्का धरुन ठेवला असता तर, त्यांना अजूनही वर सरकता आले असते, मात्र, त्यांनी तसे केले नाही.
अशा परिस्थितीत जे पदरी पडतंय, ते पवित्र करून घ्या विजयभाऊ! एरवी काँग्रेस किंवा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये तुम्ही मराठा असलात, तरच तुम्हाला महत्व मिळणार आहे, अन्यथा, तुम्हाला अधून-मधून अडगळीत टाकले जाणारच. हे लक्षात घेऊनच तुम्हाला काँग्रेस संस्कृतीशी जुळवून घेत राजकीय वाटचाल करणे, याशिवाय कुठलाही पर्याय नाही.

अविनाश पाठक
९०९६०५०५८१

Leave a Reply