अमरावती: २८ जून- अमरावती जिल्ह्यातील चिखलदरा येथील स्कायवॉक पूर्ण करण्यासाठी केंद्र शासनाकडून परवानग्या आदी प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. ती पूर्ण व्हावी व स्कायवॉकचे काम लवकरात लवकर मार्गी लागावे, यासाठी राज्य शासनाकडून केंद्र शासनाकडे पाठपुरावा होत आहे, अशी माहिती पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी आज चिखलदरा येथे दिली.
चिखलदरा दौऱ्यावर असताना त्यांनी स्कायवॉकच्या कामाची पाहणी केली. त्यावेळी त्या बोलत होत्या. चिखलदरा स्कायवॉक हे या पर्यटन स्थळाचे मुख्य आकर्षण ठरणार आहे. ते पूर्ण होण्यासाठी सातत्याने प्रयत्न होत आहेत. केंद्र शासनाकडे पुढील प्रक्रिया सुरळीत व्हावी यासाठी शासनाकडून सतत प्रयत्न होत आहेत. लवकरच ही प्रक्रिया पूर्ण होऊन काम मार्गी लागेल, असा विश्वास पालकमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केला.