उत्तर प्रदेशात एमआयएम १०० जागा लढणार – ओवेसी यांची घोषणा

लखनऊ: २८ जून-आगामी काळातील उत्तर प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत १०० जागा लढवण्याचा आम्ही निर्णय घेतला आहे. पक्षाने उमेदवारांच्या निवड प्रक्रियेस सुरूवातही केली आहे. आम्ही ओम प्रकाश राजभर यांच्या भागीदारी संकल्प मोर्चाशी आघाडी केली आहे, असं ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादूल-मुस्लमीन (एमआयएम) प्रमुख व खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी सांगितलं.
उत्तर प्रदेशमध्ये आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर, आता राजकीय हालचालींना वेग आल्याचं दिसत आहे. बहुजन समाज पार्टीच्या प्रमुख मायावती यांनी स्वबळाचा नारा देत, एमआयएम सोबतच्या आघाडीच्या चर्चांना पूर्णविराम दिला. त्यानंतर एमआयएम कडून या निवडणुकीच्या संदर्भात घोषणा करण्यात आली आहे.
उत्तर प्रदेश व उत्तराखंडमधील विधानसभा निवडणुका बसपा स्वबळावरच लढणार असल्याचं मायावतींनी या अगोदर जाहीर केलं आहे. तसेच, मागील काही दिवसांपासून या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बसपा व एमआयएम यांच्या आघाडी होणार असल्याच्या जोरदार चर्चा सुरू होत्या, त्यावर देखील मायावतींनी भूमिका स्पष्ट केली. बसपा व एमआयएम यांच्यातील आघाडीबाबतच्या चर्चा संपूर्णपणे चुकीच्या आहेत, यामध्ये काहीच तथ्य नाही, असं मायावतींनी सांगितलं आहे.

Leave a Reply