नाशिक: २७ जून- इगतपुरी येथे नाशिक ग्रामीण पोलिसांनी शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास रेव्ह पार्टीवर धाड टाकली. इगतपुरीतील एका रिसॉर्टमध्ये ही रेव्ह पार्टी सुरु होती. या छापेमारीत चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या चार महिलाही सहभागी झालेल्या होत्या. यात ‘बिग बॉस’मध्ये सहभागी झालेल्या एका महिलेचाही समावेश आहे. मुंबई-आग्रा महामार्गावरील दोन बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची मिळाल्यानंतर नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांच्या निर्देशाप्रमाणे बंगल्यावर धाड टाकण्यात आली.
इगतपुरीमध्ये मानस रिसॉर्टच्या हद्दीत स्काय ताज विला या बंगल्यात रेव्ह पार्टी सुरू असल्याची गुप्त माहिती नाशिक ग्रामीण पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी छापा टाकला होता. शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी टीमसोबत धाड टाकली.
बंगल्यात रेव्ह पार्टी सुरु असल्याचं कारवाईनंतर उघड झालं. या रेव्ह पार्टीत चित्रपट आणि मनोरंजन क्षेत्रात काम करणाऱ्या चार महिलाही सहभागी झाल्याचं कारवाईनंतर स्पष्ट झालं. तसेच ‘बिग बॉस’ या रिअँलिटी शोमध्ये भाग घेतलेल्या एका महिलेचाही समावेश आहे. १० पुरुष आणि १२ महिलांसह एकूण २२ जणांना नाशिक ग्रामीण पोलिस अधीक्षक सचिन पाटील यांनी ताब्यात घेतलं.
या कारवाईविषयी बोलताना पोलीस अधीक्षक सचिन पाटील यांनी माहिती दिली. इगतपुरीतील दोन बंगल्यांमध्ये अवैध स्वरूपाचं काम सुरू असल्याची माहिती बातमीदारांकडून पोलिसांना मिळाली होती. माहितीच्या आधारावर पोलिसांनी संबंधित बंगल्यावर कारवाई केली. यात १० पुरूष आणि १२ महिला या ड्रग्ज आणि हुक्कासेवन करताना आढळून आले.