अनिल देशमुखांनी पुत्राच्या माध्यमातून तीन कोटी रुपये वळविले – ईडीचा दावा

मुंबई:२७ जून – मुंबईतील बार, पब यांच्या मालकांकडून उकळलेल्या ४.७० कोटी रुपयांपैकी ३.१८ कोटी रुपये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचा मुलगा ऋषिकेशच्या माध्यमातून नागपूरच्या श्री साई शिक्षण संस्था ट्रस्ट या संस्थेत फिरवले. संस्थेत देणगी स्वरुपात ही रक्कम जमा झाल्याचा आभास निर्माण करण्यासाठी आधी ही रक्कम दिल्लीतील दोन व्यक्तींना हवालाद्वारे पोच केली गेली. नंतर या दोन व्यक्तींच्या नावे नोंद बोगस कंपन्यांच्या खात्यातून ही रक्कम संस्थेत वळविण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे . या व्यवहारांमध्ये देशमुख यांचा स्वीय सहायक कुंदन शिंदे प्रत्यक्ष सहभागी असल्याचेही ईडीने म्हटले आहे.
ईडीनुसार, सचिन वाझे यांनी दिलेल्या जबाबात देशमुख यांनी काही प्रकरणांच्या तपासाबाबत थेट सूचना दिल्याचे सांगितले. तसेच एका बैठकीत देशमुख यांनी शहरातील बार, पब आदी आस्थापनांकडून महिन्याकाठी तीन लाख रुपये गोळा करण्यासही सांगितले. त्यासाठी शहरातील बार मालकांची बैठक घेतली. यावर्षी जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात दक्षिण, मध्य मुंबई आणि पूर्व उपनगरांतील ऑर्केस्ट्रा बारकडून एक कोटी ६४ तर पश्चिम उपनगरांतील आस्थापनांकडून दोन कोटी ६६ लाख रुपये गोळा केले.

Leave a Reply