यवतमाळ: २६ जून- पांढरकवड्यानजिक राष्ट्रीय महामार्गावर गोवंश तस्करीचा ट्रक जप्त करण्यात आला आहे. छत्तीसगड आणि मध्यप्रदेशमधून गोवंश तस्करी थेट पांढरकवड्यापर्यंत होत आहे . येथून छुप्या मार्गाने दलालांना हाताशी धरून थेट हैद्राबाद येथे तस्करी सुरू असते. दर दोन-चार दिवसांनी पोलिस कारवाई करीत असून, पांढरकवडा पोलिस ठाण्यापर्यंत अनेक पोलिस ठाणे येत असूनही या ठिकाणी कधीच कारवाई का होत नाही? असा संतप्त सवाल विचारल्या जात आहे.
सीजी 15 ए7417 हा ट्रक भरधाव वेगाने जात असल्याने पांढरकवडा पोलिसांनी त्यास थांबण्यास सांगूनही तो पळून गेल्याने पोलिसांनी पाठलाग करत त्यास अडविले. परंतु अंधाराचा फायदा घेत चालक व वाहक पळून गेले. पोलिसांनी ट्रकची पाहणी केली असता त्यात ३७ बैल मरणासन्न अवस्थेत आढळून आले. त्या सर्वांची पोलिसांनी तातडीने सुटका करून सुरक्षित ठिकाणी रवानगी केली. पोलिसांनी गोवंश आणि ट्रक जप्त केला आहे. आरोपीविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागणूक देणे, तसेच महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियमानुसार गुन्हा नोंदविला. ही कारवाई ठाणेदार रामकृष्ण महल्ले यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलिस निरीक्षक हेमराज कोळी, राजू सुरोशे, सिद्धार्थ कांबळे यांनी पार पाडली.