नागपूर: २६ जून- उत्तर प्रदेशातील निर्बल इंडियन शोषीत हमारा आमदल अर्थात निषाद पार्टी महाराष्ट्रात आली आहे. निषाद पार्टी महाराष्ट्रात भाजपासोबत आघाडीसाठी उत्सुक आहे.या पक्षाच्या वतीने सदस्य नोंदणीही सुरू करण्यात आली आहे. या पक्षाच्यावतीने जिल्हा परिषद, पंचायत समिती एवढेच नव्हे तर नागपूर महानगर पालिकेच्या निवडणुकीत उमेदवार रिंगणात उतरविले जाणार आहेत, अशी माहिती संयोजक अँड. दादासाहेब वलथरे यांनी दिली.
दरम्यान, उत्तर प्रदेशात होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीत निषाद पार्टी भाजपासोबत आघाडी करण्याची शक्यता आहे. याअनुषंगाने नुकतीच निषादचे खासदार प्रवीणकुमार निषाद व डॉ. संजयकुमार निषाद यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. तो प्रयोग यशस्वी झाल्यास महाराष्ट्रातही त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत, असेही दादासाहेब वलथरे यांनी स्पष्ट केले. नागपुरातील मनपा निवडणुकीत निषाद पार्टीची युती भाजपासोबत झाल्यास दोघांनाही भरपूर लाभ होईल याकरिता आम्ही त्यादृष्टीने प्रयत्न करीत आहोत असेही त्यांनी सांगितले.
मनपा निवडणुकीत कुठल्या उमेदवारांना संधी द्यायची याची चाचपणी निषाद पार्टीच्या वतीने सुरू झाली आहे. एवढेच नव्हे तर जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकीतही आम्ही पूर्ण जोमाने उतरणार आहोत, असेही ते म्हणाले.