अनिल देशमुखांच्या दोन स्वीय सहाय्यकांना ईडीने केली अटक

मुंबई: २६ जून- राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ होताना दिसत आहे. शुक्रवारी दिवसभर सक्तवसुली संचालनालयाकडून (ईडी)त्यांच्या नागपूर व मुंबईमधील निवासस्थानी छापेमारी करण्यात आल्यानंतर, आज शनिवारी त्यांचे स्वीय सहायक (पीए) संजीव पलांडे व कुंदन शिंदे यांना अटक करण्यात आली आहे. या दोघांनाही कालच चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलं होतं. आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ही अटक करण्यात आली आहे. दोघांची वैद्यकीय चाचणी करुन त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. या दोघांनाही ईडीने चौकशीसाठी बोलावले होते. बार मालकांच्या जबाबानंतर त्यांना अटक करण्यात आली आहे.
यापूर्वीही मुंबई येथे देशमुख यांची सक्तवसुली संचालनालयाकडून चौकशी झाली होती. त्याशिवाय केंद्रीय अन्वेषण विभागानेही त्यांच्या घरी छापे टाकले होते.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर शंभर कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. त्यामुळे देशमुख यांना गृहमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हापासून देशमुख यांची केंद्राच्या विविध पथकांकडून चौकशी सुरू आहे.
उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाच्या परिसरात स्फोटकांची गाडी उभी करण्याच्या प्रकरणात मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांची भूमिका संशयास्पद होती. पदावरून हटविण्यात आल्याच्या रागातून त्यांनी आपल्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले. आयुक्तपदी असताना ते गप्प का होते? असा सवाल करीत माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत .

Leave a Reply