नागपूर : २५ जून – खासगी शाळांकडून पालकांवर अनावश्यक दबाव टाकून फी वसुली केली जात आहे. या विरोधात शिवसेना युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज नागपूर येथील शिक्षण उपसंचालक कार्यालयासमोर प्रदर्शन करत जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी आंदोलकांनी आपल्या मागण्यांच्या संदर्भात शिक्षण उपसंचालकांना निवेदन दिले.
कोरोना काळात विद्यार्थ्यांना ऑनलाइन शिक्षण घ्यावे लागत आहे. तरीदेखील खासगी शाळांकडून पूर्ण फीकरिता तगादा लावला जात आहे. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे अनेकांनी रोजगार गमावले आहेत. त्यामुळे पालकांची आर्थिक परिस्थिती कमकुवत झाली आहे. अशा संकटात गरीब पालक शाळेची पूर्ण फी भरू शकत नाही. त्यातच आता ऑनलाइन शिकवणीमुळे पालकांचा खर्च सुद्धा वाढला आहे. हे सगळे बघता शाळांनी पालकांचा विचार करावा आणि शाळेचे शुल्क 50 टक्के करावे, अशी मागणी शिवसेना युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केली आहे.
आपल्या पाल्यांना शिकवता पालकांची प्रचंड ओढाताण होत आहे. तरीदेखील खासगी शाळांकडून पालकांवर दबाव तयार केला जात असल्याने शिवसेना युवा मोर्चाकडून या संदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनाही निवेदन पाठवण्यात येणार असल्याची माहिती आंदोलकांनी दिली.