पुणे : २५ जून – आणीबाणी हे काँग्रेसचं लोकशाही पायदळी तुडवण्याचं लांच्छनास्पद कारस्थान असल्याची टीका भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केली आहे. त्यांनी ट्विट करत याबद्दल आपली नाराजी व्यक्त केली आहे. आणीबाणी लागू केल्याला ४६ वर्षे आज पूर्ण झाली आहे.
त्यांनी याबद्दल केलेल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे, “‘गरीबी हटाव’च्या घोषणा हवेतच विरल्या. दारिद्र्य निर्मूलनाचे स्वप्न दाखवणाऱ्या इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सरकारने आणीबाणीच्या काळात राबवलेल्या आर्थिक धोरणांमुळे भारतीय अर्थव्यवस्था मोडकळीस आली आणि याचे भारतावर दूरगामी परिणाम झाले”.
या ट्विटसोबतच चंद्रकांत पाटील यांनी एक फोटोही शेअऱ केला आहे. ज्यात लिहिलं आहे, “आणीबाणी- भारतीय लोकशाहीला पायदळी तुडवण्याचे काँग्रेसचे लांच्छनास्पद कारस्थान. पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने भारतीय अर्थव्यवस्था संपूर्णरित्या उद्धवस्त केली, अर्थचक्राची गती मंदावली, बेरोजगारी वाढली आणि सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन रोखले. ‘गरिबी हटाव’ अशी घोषणा देणाऱ्या इंदिरा गांधींनी प्रत्यक्षात मात्र ‘गरिबी बढाव’च्या दिशेनेच कृती केली”.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही आणीबाणीचा निषेध करत ट्विट केलं आहे. या ट्विटमध्ये ते म्हणतात, “आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. १९७५ ते १९७७ या काळात संस्थांचा नाश झाला. आपण भारतीय लोकशाही भावनांना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करूया आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करुया ”