आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही – पंतप्रधान नरेंद्र मोदी

नवी दिल्ली: २५ जून- तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी २५ जून१९७५ रोजी देशात आणीबाणीची घोषणा केली होती. आज शुक्रवारी या दिवसाला ४६ वर्षे पूर्ण झाली आहेत. २५ जून १९७५ ते २१ मार्च १९७७ या काळात देशात २१ महिने आपत्कालीन परिस्थितीची अंमलबजावणी करण्यात आली होती. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्वीट करत काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, “आणीबाणीच्या त्या काळ्या दिवसाला विसरता येणार नाही. १९७५ ते १९७७ या काळात संस्थांचा नाश झाला होता . आपण भारतीय लोकशाही भावनांना बळकट करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचा संकल्प करू आणि राज्यघटनेत नमूद केलेल्या मूल्यांचे पालन करु या.
इंस्टाग्रामवर शेअर करत पंतप्रधानांनी लिहिले आहे की काँग्रेसने आपल्या लोकशाही आचारांना चिरडले. आणीबाणीला विरोध दर्शविणारे आणि भारतीय लोकशाहीचे रक्षण करणारे सर्व महान लोक यावेळी आम्हाला आठवतात.
दरम्यान, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीदेखील टीका केली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह ट्विटमध्ये म्हणाले की, १९७५ च्या या दिवशी कॉंग्रेसने सत्तेच्या स्वार्थापोटी आणि अहंकाराने देशावर आणीबाणी लादून जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीची हत्या केली होती.

Leave a Reply