अनिल देशमुख हे छगन भुजबळांच्या मार्गावर – किरीट सोमय्या यांचा आरोप

मुंबई : २५ जून – माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीनं छापे टाकले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी त्यांनी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीकाही केली आहे. अनिल देशमुख हे जेलमध्ये जाणारच, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
अनिल देशमुख हे जेलमध्ये जाणारच असं म्हणत देशमुख हे छगन भुजबळ यांच्या मार्गावर जात आहेत, अशी धक्कादायक प्रतिक्रिया किरीट सोमय्या यांनी दिली आहे. अनिल देशमुख यांनी वाझे प्रकरणातील पैसे हे कोलकत्ता मधील बोगस कंपनीच्या माध्यमातून, नातेवाईकांच्या नावाने बांधकाम व्यवसायात गुंतवले असल्याचा दावाही सोमय्यांनी केला आहे.
देशमुख जेलमध्ये जाणार. अनिल परब पण याच मार्गाने जात आहेत. भुजबळ देशमुखनंतर अनिल परब पण जेलमध्ये जाणार, त्यानंतर मिलिंद नार्वेकर पण जाणार, असं वक्तव्य करत सोमय्यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.
अनिल देशमुख यांच्या घरावरील ईडी छाप्याप्रकरणी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून भाजपवर टीका केली जात आहे. भाजप हे सुडबुद्धीनं करत असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. यावरही किरीट सोमय्या प्रतिक्रिया देत सत्ताधाऱ्यांना फटाकरलं आहे. अनिल देशमुख यांच्या घरावर ED चे छापे पडले आहेत. हो, आम्ही हे जाणीवपूर्वक करत आहोत. कारण कोरोना सुरू असताना अनिल देशमुख यांची वसुली सुरु होती. याचा आम्ही पाठपुरावा केला, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा डावा हात शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर हे मुरुड, दापोली येथे समुद्र किनाऱ्यावर बेकायदेशीर बंगला बांधत आहेत. अनिल परब यांच्या वाटेवर मिलिंद नार्वेकर यांना जावे लागणार आहे. अनिल परब यांच्या बंगळ्याजवळच नार्वेकर यांच्या बंगल्याचे काम सुरू आहे. याला मार्गदर्शन आदित्य ठाकरे यांचे आहे. नार्वेकर यांच्या बंगल्याला कुठलीही पर्यावरण संदर्भातली परवानगी नाही आहे. त्यामुळे या सर्व प्रकरणाची अनिल परब, मिलिंद नार्वेकर यांच्या बंगल्याच्या बांधकामाची सीबीआय चौकशी व्हायला हवी, अशी मागणीही सोमय्यांनी केली आहे.

Leave a Reply