अनिल देशमुख यांची ईडी चौकशी ही नैराश्यातून – शरद पवार यांची प्रतिक्रिया

पुणे : २५ जून – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरावर ईडीच्या अधिकाऱ्यांनी आज सकाळी धाड टाकली. त्यासोबतच अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांनाही चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या संपूर्ण प्रकरणावर राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी प्रतिक्रिया देत आम्हाला या चौकशीची चिंता नसल्याचं म्हटलं आहे.
शरद पवारांनी म्हटलं, अनिल देशमुख यांची ईडी चौकशी ही नैराश्यातून आणि त्रास देण्यासाठी होत आहे. या गोष्टी आम्हाला नव्या नाहीत, या गोष्टीची आम्हाला कसलीही चिंता नाही. देशमुखांच्या चौकशीची आम्हाला चिंता वाटत नाही. ईडी, सीबीआयद्वारे सूड उगवण्याचा नवा पॅटर्न तयार झाला आहे.
अजित पवार यांच्या सीबीआय चौकशीचा ठराव काल ज्या पक्षाने मांडला. त्या पक्षातर्फे ज्यांनी मांडला ते बुद्धिमान गृहस्थ आहेत असं म्हणून शरद पवारांनी भाजप नेत्यांना टोला लगावला आहे.
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास ईडीच्या पथकाने छापेमारी केली. त्यानंतर आता अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. संजीव पलांडे हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. एकूणच संपूर्ण प्रकरणामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.

Leave a Reply