मुंबई : २५ जून – राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घरी आज सकाळच्या सुमारास ईडी च्या पथकाने छापेमारी केली. त्यानंतर आता अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक संजीव पलांडे यांना ईडीने चौकशीसाठी बोलावले आहे. संजीव पलांडे हे ईडीच्या कार्यालयात दाखल झाले आहेत. एकूणच संपूर्ण प्रकरणामुळे अनिल देशमुख यांच्या अडचणीत वाढ झाल्याचं बोललं जात आहे.
संजीव पलांडे हे अनिल देशमुख यांचे स्वीय सहाय्यक आहेत. संजीव पलांडे यांना ईडीच्या अधिकाऱ्यांनी ताब्यात घेतले असून आता त्यांची चौकशी सुरू करण्यात आली आहे.
मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी लेटर बॉम्ब टाकत अनिल देखमुख यांच्यावर 100 कोटी रुपयांच्या वसुली करण्याचा आरोप केला होता. इतकेच नाही तर या संपूर्ण प्रकरणात संजीव पलांडे यांच्या नावाचाही उल्लेख झाला होता. अनिल देशमुख यांनी हे सर्व आरोप फेटाळले होते मात्र, या प्रकरणावरुन गृहमंत्री अनिल देशमुख यांना आपल्या पदाचा राजीनामाही द्यावा लागला आहे.
आता संजीव पलांडे यांची ईडीकडून चौकशी सुरू करण्यात आली असून या चौकशीत काय समोर येतं हे पहावं लागेल. दरम्यान आज सकाळीच ईडीच्या पथकाने अनिल देशमुख यांच्या नागपूर येथील निवासस्थानी छापेमारी केली. दरम्यान ज्यावेळी ही कारवाई झाली त्यावेळी अनिल देशमुख हे नागपूर येथील निवासस्थानी नव्हते.