भाजप २६ जून रोजी करणार राज्यभर आंदोलन – हंसराज अहिर यांची माहिती

वाशीम : २४ जून – राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील सर्वात मोठा मतदार असलेला ओबीसी समाज आपल्या हक्कापासून वंचित राहणार आहे. ओबीसींना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी भाजप रस्त्यावर येणार असून, २६ जून रोजी राज्यभर आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी केंद्रीय मंत्री हंसराज अहीर यांनी वाशीम येथे स्थानिक भाजप जनसंपर्क कार्यालयात ओबीसी आरक्षण आंदोलनाबाबत माहिती देताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
या पत्रकार परिषदेत भाजपा ओबीसी सेलचे पश्चिीम विदर्भ प्रमुख राजेंद्र डांगे, आमदार लखन मलिक, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष बाळू मुरकुटे, संघटन मंत्री सुनील राजे, जिल्हा महामंत्री नागेश घोपे, सुनील काळे, पुरुषोत्तम चितलांगे, राहुल तुपसांडे आदींची उपस्थिती होती. पुढे बोलताना माजी मंत्री अहीर म्हणाले की, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमधून छोट्या छोट्या समाजाचे राजकीय नेतृत्व उदयास येते. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने ओबीसीमधील राजकीय नेतृत्व संपविण्याचे षडयंत्र रचले असून, या सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी आरक्षणावर आघात झाला आहे.
महाविकास आघाडी सरकारने सर्वोच्च न्यायालयात सक्षमपणे बाजू मांडली नाही. इम्पोरिकल डाटा दिला नाही. कागदपत्राची पुर्तता केली नाही. खंडपिठाला योग्यप्रकारे उत्तरे देण्याची गरज होती. मात्र, गत १५ महिन्यात काहीच न केल्याने सर्वोच्च न्यायालयात आरक्षण टिकले नाही. याउलट केंद्रातील मोदी सरकारने संवैधानिक दर्जा दिला. तसेच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना ओबीसी आरक्षण टिकविले व स्वतंत्र मंत्रालय स्थापन केले असल्याचे हंसराज अहीर यांनी सांगितले.

Leave a Reply