बिहारमध्ये नव्या राजकीय समीकरणांची शक्यता

पाटणा: २४ जून- लोक जनशक्ती पक्षात राजकीय संकट तीव्र झाल्यानंतर आगामी काळात बिहारमध्ये नवीन राजकीय समीकरणे निर्माण होऊ शकतात. चिराग पासवान आणि पशुपती पारस यांच्या संघर्षात इतर राजकीय पक्षदेखील संधी शोधात आहेत. राजद नेते तेजस्वी यादव यांनी चिराग यांना रालोआ सोडून त्यांच्या पक्षात येण्याचे आमंत्रण दिले आहे.
लोक जनशक्ती पक्षात २०१०मध्ये जेव्हा खासदार आणि आमदार नव्हते, तेव्हा लालुप्रसाद यांनी रामविलास पासवान यांना मदत करत राज्यसभेत पाठविल्याचे तेजस्वी यादव यांनी चिराग यांना लक्षात आणुन दिले आहे.
तेजस्वी यादव म्हणाले, चिराग पासवान यांनी ते गोळवलकर गुरुजींच्या विचारांचे अनुसरण करणाऱ्यांसोबत राहतील की भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. आंबेडकरांच्या अनुयायांसोबत जातील, याचा विचार करावा. यावेळी तेजस्वी यादव यांनी मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यावरही निशाणा साधला. तेजस्वी म्हणाले, मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्या अज्ञानामुळेच आज बिहार या परिस्थितीत आला आहे. राज्यात बेरोजगारी आणि दारिद्र्य आहे.
दरम्यान, लोक जनशक्ती पक्षातील संघर्षांत भाजपाने बघ्याची भूमिका घेतल्याने आपण दुखावलो असल्याची प्रतिक्रिया खासदार चिराग पासवान यांनी व्यक्त केली आहे. मला जर अडचणीत आणण्याचा प्रयत्न झाला, तर भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने सर्व पर्याय पडताळून पाहिले जातील, असा इशारा त्यांनी भाजपला दिला आहे.

Leave a Reply