धुळे: २४ जून – काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना तातडीने दिल्लीला बोलवण्यात आले आहे. पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकारणात हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धवट सोडून नाना पटोले आज गुरुवारी दिल्लीला रवाना होणार आहेत.
नवी दिल्लीत काँग्रेसची शुक्रवारी महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यामुळे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना दिल्लीत येण्याचे पक्षश्रेष्ठींनी आदेश दिले आहे. नाना पटोले तीन दिवसांच्या उत्तर महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले आहेत . त्यामुळे धुळे जिल्ह्याचा दौरा अर्धात सोडून आज सायंकाळी नाना पटोले मुंबईला जाणार आहेत . आज संध्याकाळीच ते मुंबईहून पुढे दिल्लीला रवाना होणार आहेत. पावसाळी अधिवेशन येऊ घातले असून, अद्याप विधानसभा अध्यक्षांचे नाव निश्चित झाले नाही. त्यामुळे हे नाव निश्चित करण्यासाठी दिल्ली जात असल्याचं पटोले म्हणाले.
दरम्यान, विधानसभा अध्यक्षपद रिक्त झाल्यामुळे काँग्रेसमधून त्या जागी कुणाची निवड होणार यावर गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरू आहे. ऊर्जामंत्री नितीन राऊत यांच्याकडे विधानसभा अध्यक्षपद देण्यात यावे, अशी चर्चा मध्यंतरी रंगली होती. विधानसभा अध्यक्षपद नितीन राऊत यांना दिले तर त्यांच्याकडे असलेले ऊर्जा खाते हे नाना पटोले यांना देण्यात येण्याची शक्यता आहे. मध्यंतरीच्या काळात वाढीव वीज बिलाच्या मुद्यावरून नितीन राऊत यांनी टीकेचा सामना करावा लागला होता, हे येथे उल्लेखनीय.
विशेष म्हणजे, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे सध्या दिल्लीतच आहे. दोन दिवसांपूर्वीच काँग्रेस नेते कमलनाथ आणि अभिषेक मनू सिंघवी यांनी शरद पवार यांची भेट घेतली होती.