नवी मुंबई विमानतळ नावाचा वाद – आंदोलन चिघळण्याच्या मार्गावर

नवी मुंबई : २४ जून- नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्याच्या मागणीसाठी प्रकल्पग्रस्त भूमिपुत्रांनी आज गुरुवारी सकाळपासून ‘सिडको’ला घेराव आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर, नवी मुंबईतील सिडको कार्यालयाबाहेर कडेकोट पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. दि. बा. पाटील यांच्या नावाच्या समर्थनार्थ पोस्टर, झेंडे घेत आंदोलनकर्ते मोर्चात सहभागी झाले आहेत. सुमारे तीन हजार पोलिस कर्मचारी आंदोलनस्थळी बंदोबस्तासाठी आहेत. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नामकरणाचा वाद दिवसेंदिवस चिघळत चालला आहे. राज्य सरकारने बाळासाहेब ठाकरेंचं नाव देण्याचा निर्णय घेतला असताना नवी मुंबईतील स्थानिक दि बा पाटील यांच्या नावावर ठाम आहेत.
दरम्यान, नवी मुंबईच्या तांडेल मैदानात आंदोलनकर्त्यांची गर्दी जमायला सुरवात झाली. विरारहून बस, ऑटो, गाड्यांमधून झेंडे आणि फलक घेऊन कोळी-आग्री बांधव दाखल झाले आहेत. नवी मुंबई विमानतळाला दि. बा. पाटील यांचंच नाव द्या, या मागणीसाठी समाज एकवटला आहे. आंदोलन परिसर गजबजला असून, आंदोलनात महिलांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. आंदोलनस्थळी जोरदार घोषणाबाजी होत आहे.
दरम्यान, आंदोलनस्थळी महिलांनी वटपौर्णिमा साजरी केली. शेजारीच महिलांनी वडाच्या झाडाला फेरे मारले. यावेळी वटपौर्णिमेच्या मुहूर्तावरच आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि. बा.पाटलांचं नाव देण्याचं साकडं महिलांनी घातलं. दरम्यान, पाटील यांचं नाव देण्यासाठी आयोजित मोर्चात मनसे आमदार राजू पाटीलदेखील सहभागी झाले आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी या विमानतळाला छत्रपती शिवाजी महाराजांचंच नाव असलं पाहिजे असं स्पष्ट मत व्यक्त केले होते, हे येथे उल्लेखनीय.

Leave a Reply