जितेंद्र आव्हाड – देवेंद्र फडणवीस यांच्या कथित भेटीच्या बातमीमुळे राजकीय अटकळींना जोर

मुंबई : २४ जून – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिल्लीवारीनंतर महाराष्ट्रातील राजकीय घडामोडींना कमालाची वेग आला आहे. अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यात दोन दिवसांपूर्वी गुप्त बैठक झाल्याची माहिती समोर आली आहे. दिल्लीत पंतप्रधान मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यातील खासगी चर्चेनंतर शिवसेना-भाजप पुन्हा जवळ येऊ लागल्याची चर्चा सुरु झाली होती. मात्र, आता स्थानिक पातळीवर आव्हाड-फडणवीस भेटीने भाजप आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही बंद दाराआड चर्चा सुरु असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकारण नक्की कोणत्या दिशेला जात आहे, याचा कोणताच अंदाज येईनासा झाला आहे.
दरम्यान, जितेंद्र आव्हाड आणि देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकी राजकीय नसल्याचेही सांगण्यात येत आहे. पोलिसांच्या घरांबाबत चर्चा करण्यासाठी हे दोन्ही नेते भेटले होते. देवेंद्र फडणवीस यांनी काही दिवसांपूर्वी गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांना बीडीडी चाळीतील पोलिसांच्या घरासंदर्भात पत्र लिहले होते. त्यावरच आव्हाड आणि फडणवीस यांच्यात चर्चा झाली. ही बैठक तब्बल अडीच तास सुरु होती. त्यामुळे या भेटीत राजकीय चर्चा झाल्याची शक्यता पूर्णपणे नाकारता येणार नाही, असा अंदाज जाणकारांनी वर्तविला आहे.
गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी म्हाडाच्या 100 सदनिका टाटा कॅन्सर रुग्णालयाला देण्याचा निर्णय घेतला होता. त्या निर्णयाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्थगिती दिली. या विषयावरुन राजकारण तापल्यानंतर आता मुख्यमंत्र्यांकडून डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न झाल्याचं पाहायला मिळत आहे.
त्याबाबत खुद्द जितेंद्र आव्हाड यांनी बुधवारी प्रसारमाध्यमांशी बोलताना माहिती दिली. 100 सदनिका रुग्णांच्या नातेवाईकांसाठी देण्यात येत आहेत. काही स्थानिकांनी विरोध केला आणि आमदारांनी मुख्यमंत्र्यांना सांगितलं. मुख्यमंत्र्यांनी त्याला स्थगिती दिली. पण मुख्यमंत्र्यांनी मला आज बोलावून घेतलं आणि सांगितलं की, त्याच परिसरात आजच्या आज जागा शोधून निर्णय घ्या. 15 मिनिटात निर्णय झाला. बॉम्बे डाईंगमध्ये १०० सदनिका देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आव्हाड यांनी माध्यमांशी बोलताना दिली होती.

Leave a Reply