सूरत: २४ जून- काँग्रेस नेते राहुल गांधी गुजरातमधील सूरत येथील दंडाधिकारी न्यायालयात आज गुरुवारी सकाळी १० वाजता हजर झालेत. मोदी आडनावावरुन राहुल गांधींनी केलेल्या वक्तव्यावरुन त्यांच्याविरोधात अब्रूनुकसानीचा खटला दाखल करण्यात आला आहे. भाजप आमदाराने हा खटला दाखल केला असून, याचप्रकरणी राहुल गांधी जबाब नोंदण्यासाठी न्यायालयात हजर झालेत. भाजप आमदार पुर्णेश मोदी यांनी दाखल केलेल्या खटल्यावरील सुनावणीदरम्यान सूरतच्या मुख्य न्यायदंडाधिकाऱ्यांनी राहुल गांधी यांना त्यांचा जबाब नोंदवण्याचा आदेश दिला होता.
पुर्णेश मोदी यांनी एप्रिल २०१९ मध्ये दिलेल्या तक्रारीत, राहुल गांधी हे निवडणुकीच्या निमित्ताने संपूर्ण मोदी समुदायाची बदनामी करत आहेत, असा आरोप केला होता. राहुल गांधी यांनी १३ एप्रिल २०१९ मध्ये कर्नाटकमधील सभेत केलेल्य्या वक्तव्याच्या आधारे ही तक्रार करण्यात आली होती. नीरव मोदी, ललित मोदी, नरेंद्र मोदी यांचं सारखं आडनाव कसं काय? सर्व चोरांचे मोदी हेच आडनाव कसं काय आहे?, असं वक्तव्य राहुल गांधींनी केलं होतं. त्यावेळी राहुल गांधी हे काँग्रेसचे अध्यक्ष होते. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर मे महिन्यात त्यांनी अध्यक्षपद सोडलं होतं.