साईबाबा संस्थानच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीचे आ. आशुतोष काळे

शिर्डी: २३ जून -शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या युवा आमदाराची वर्णी लागली आहे. अहमदनगरमधील राष्ट्रवादीचे आमदार आशुतोष काळे यांची अध्यक्षपदी, तर उपाध्यक्षपदी शिवसेनेच्या माजी आमदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळावर काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी सहा, तर शिवसेनेचे पाच सदस्य असतील. तर पंढरपूरचे विठ्ठल रुक्मिणी देवस्थानाची धुरा काँग्रेसच्या खांद्यावर देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विश्वस्त मंडळाची मुदत तीन वर्षांसाठी असते.
साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळाचे अध्यक्ष कोण असणार यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादीत गेल्या काही दिवसांपासून रस्सीखेच सुरु होती. मुंबईच्या सिद्धीविनायक ट्रस्टचं अध्यक्षपद शिवसेनेकडे गेल्याने शिर्डीच्या साईबाबा संस्थान अध्यक्षपदासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांमध्ये वाटाघाटी सुरु होत्या. अहमदनगर जिल्ह्यात राष्ट्रवादीचे सहा आमदार असल्यामुळे विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदावर राष्ट्रवादीने दावा केला होता.
३५ वर्षीय आशुतोष काळे हे अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगा येथील राष्ट्रवादीचे आमदार आहेत. माजी आमदार अशोकराव काळे यांचे ते पुत्र, तर माजी खासदार शंकरराव काळे यांचे ते नातू आहेत. त्यांच्याकडे कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याच्याही अध्यक्षपदाची धुरा आहे. आता त्यांची शिर्डी साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळाच्या अध्यक्षपदी वर्णी लागली.

Leave a Reply