वाकीच्या डोहात ४ युवकांना जलसमाधी

नागपूर : २३ जून – कोरोना बाधितांची आकडेवारी कमी होताच प्रशासनाने मोकळीक दिली आहे. याच मोकळीकचा आनंद लुटता यावा म्हणून नागपुरातील काही युवक वाकी परिसरात मौजमजा करण्यासाठी आले होते. तिथेच पोहण्याचा आनंद घेत असताना चार युवकांना तिथे जलसमाधी मिळाली. अशी ही दुर्दैवी घटना खापा पोलिस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या वाकी परिसरातील कन्हान नदीच्या पात्रात घडली.
तौफीक आशिक खान, प्रवीण गलोरकर, अतेल शेख नासीर, आरीफ अकबर पटेल अशी मृत युवकांची नावे आहेत. ही सर्व युवा मंडळी नागपुरातील रहिवासी होते. कोरोनामुळे हे सर्व युवक घरातच बंदिस्त होते. कुठे जाता येत नसल्याने त्यांच्यात निराशा आली होती. दरम्यान जून महिन्यात मोकळीक सुरू होताच सर्व मित्रांनी वाकी येथे पार्टीचा बेत आखला. त्यानुसार दहा ते बारा मित्र नागपुरातून वाकी परिसरातील कन्हान नदीच्या पात्रात गेले. तिथे वातावरण गरम असल्याने चौघांनी पोहण्याचा निर्णय घेतला. इतरांनी मात्र काठावरच बसण्याचा निर्णय घेतला. तौफीक, प्रवीण, अतेश आणि आरीफ पाण्यात उतरले. त्यांना वाटले की, त्या भागात पाणी अधिक खोल नसेल. मात्र त्यांचा अंदाज सपशेल चुकला आणि तिथेच घात झाला. अधिक खोल खड्डा आणि डोह असल्याने चारही मित्र एकाचवेळी पाण्यात बुडाले. काठावर उभ्या असलेल्या मित्रांनी आरडाओरड केल्याने काहीजणांनी त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवाने तोपर्यंत चौघांचा पाण्याने बळी घेतला होता. स्थानिक मासेमार बांधवांच्या मदतीने एकाचा मृतदेह शोधण्यात यश आले. मात्र इतर तिघांचे शव काही केल्या न मिळाल्याने आता शोध मोहीम सकाळी सुरू होणार आहे.
घटनेची माहिती मिळताच खापा पोलिस स्टेशनचे ठाणेदार अजय मानकर सहकार्यांहसह हजर होते. त्यांनी या घटनेविषयी दु:ख व्यक्त केले आहे. दरम्यान एसडीआरएफच्या चमूला त्यांनी घटनास्थळी बोलावून त्यामार्फत युवकांचे मृतदेह शोधण्याचा प्रयत्न केला. मात्र अंधार पडल्यानंतर शोधकार्य नाईलाजाने थांबविण्यात आले.

Leave a Reply