लोकांच्या मनातील आग भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही – नाना पटोले

जळगाव : २३ जून – सत्ता ही लोकांच्या सुरक्षेसाठी असली पाहिजे, दुराचारासाठी नाही. पण भाजपने ज्या पद्धतीने देशात दुराचार माजवला आहे. त्या विरोधात आज सामान्य जनता तसेच काँग्रेसजन अशा सर्वांच्या मनात आग पेटली आहे. उद्या ही आग बाहेर आली तर भाजपला जमीनदोस्त केल्याशिवाय राहणार नाही. केंद्रातले मोदी सरकार हे इंग्रजांपेक्षाही अत्याचारी आहे, अशी घणाघाती टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी भाजपवर केली. राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या होम ग्राऊंडवर नाना पटोले यांनी मोदी सरकारविरोधात जोरदार बॅटिंग केली.
पक्ष संघटनेचा आढावा घेण्यासाठी नाना पटोले हे आज (बुधवारी) जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. जिल्ह्यातील फैजपूर येथे नवीन कृषी कायद्यांची होळी केल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी प्रदेश उपाध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, आमदार शिरीष चौधरी, जिल्हाध्यक्ष ऍड. संदीप पाटील, माजी खासदार डॉ. उल्हास पाटील आदींची उपस्थिती होती.
केंद्रातल्या अत्याचारी मोदी सरकारने जे कृषी विषयक तीन काळे आणले. त्या कायद्यांचे दहन करण्यासाठी मी फैजपुरात आलो आहे. गेल्या सहा महिन्यांपासून शेतकरी या कायद्यांना विरोध करत आहेत. फैजपूर ही पावन भूमी आहे. याच भूमीतून काँग्रेसने त्या काळात इंग्रजांच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेण्यासाठी 50 वे अधिवेशन घेतले होते. त्याची प्रतिकृती म्हणून आज केंद्रात जे भाजपचे सरकार आहे, ते इंग्रजांपेक्षाही अत्याचारी आहे. त्यांनी आणलेल्या कायद्यांचे आज दहन केले आहे.
पाशवी बहुमताच्या आधारावर मोदी सरकार देशाची आर्थिक व्यवस्था, शेतकरी, बेरोजगार आणि गरिबांना संपवण्याचे काम करत आहे. हे लोक बघत आहेत. या अत्याचारी सरकारची 5 वर्षे संपण्याची वाट देशातील जनता पाहत आहे. 2024 मध्ये जनता मोदी सरकारला पायउतार केल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला.
भाजपच्या विरोधात कोणत्याही प्रकारची आघाडी काँग्रेस शिवाय होऊच शकत नाही. काँग्रेस पक्ष हा युपीएचे हृदय आहे. जर कोणताही विरोधी पक्ष तिसरा मोर्चा काढायला गेला तर त्याचा सरळ फायदा भाजपला होईल, हे आता सर्वांना कळले आहे. त्यामुळे काँग्रेसला सोडून अशी तिसरी आघाडी होणार नाही, असं नाना पटोले म्हणाले.

Leave a Reply