प्राजक्ता लवंगारे-वर्मा नागपूर विभागाच्या नव्या आयुक्त

नागपूर: २३ जून – नागपूर विभागाच्या आयुक्त म्हणून प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची बदली करण्यात आली आहे. सामान्य प्रशासन विभागाने यासंदर्भात आदेश जारी केले आहेत.
गेल्या आठवड्यात विभागीय आयुक्त डॉ. संजीवकुमार यांची बृहन्मुंबई महानगरपालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणुन बदली झाली आहे. त्यांच्या जागेवर नवीन अधिकारी न आल्यामुळे ते जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्याकडे पदभार सोपवून ते मुंबईला रवाना झाले. त्यांच्या रिक्त जागी आज मंत्रालयातील मराठी भाषा विभागाच्या सचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांची विभागीय आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. लवंगारे ह्या २००१ तुकडीच्या आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी अहमदनगर जिल्हा परिषदेच्या सीईओ, धुळे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून २००९ साली काम पाहिले. तिथे धवल भारती अभियान राबविले. नंतर मुंबईत मुख्य सचिव रत्नाकर गायकवाड यांच्याकडे सहसचिव म्हणून काम केले. मुंबई येथील सिडकोच्या सहसंचालकपदी काम केले. त्यानंतर उत्पादन शुल्क आयुक्त असताना वर्षभरात म्हणजे १००८ कोटीचा अतिरिक्त महसूल मिळवून दिला.
मंत्रालयात मराठी भाषा सचिव म्हणून कार्यरत असताना कोरोना काळात मुंबईतील स्थलांतरितांना वेळच्या वेळी भोजन मिळावे, तसेच त्यांचे अन्य प्रश्न सोडवण्याबरोबरच रुग्णालयांसाठी स्वयंसेवक तयार करण्याची जबाबदारी सचिव प्राजक्ता लवंगारे यांच्यावर शासनाने सोपविली होती. प्राजक्ता लवंगारे यांचे वडील मुंबई महानगरपालिकेत निरीक्षक तर आई महानगरपालिकेच्या भगवती हॉस्पिटलमध्ये परिचारिका होत्या. त्या उत्पादन शुल्क विभागाच्या आयुक्त म्हणून अतिशय चांगले काम करीत होत्या. विभागाच्या उत्पन्न वाढीसाठी त्यांनी केलेल्या उपाययोजना फलदायी ठरल्या. लोकाभिमुख प्रशासन देण्यावर त्यांचा भर आहे.

Leave a Reply