गोंदिया :२३ जून- महाराष्ट्र राज्य अधिपरिचारिका संघटनेच्या वतीने गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिपरिचारिकांच्या विविध मागण्यासाठी २३ व २४ जून रोजी हरताळ पुकारण्यात आला आहे. या दोन दिवसात मागण्या मान्य न झाल्यास २५ जूनपासून बेमुदत कामबंद करण्याचा इशाराही शासन, प्रशासनाला देण्यात आला आहे.
गोंदिया शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत अधिपरिचारिका आपल्या विविध मागण्यासंदर्भात सातत्याने संबंधितांकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यांच्या मागण्याकडे शासन, प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे. आपल्या मागण्याकडे लक्ष वेधण्यासाठी २१ व २२ जून रोजी अधिपरिचारिकांनी दोन तासांचे सांकेतिक आंदोलन केले होते. मात्र त्यांच्या आंदोलनाची दखल घेण्यात आली नाही. परिणामी, हरताळ पाळण्याचा निर्णय अधिपरिचारिकांनी घेतला आहे. तसेच या दोन दिवसात त्यांच्या मागण्या मान्य न झाल्यास २५ जूनपासून बेमुदत कामबंद आंदोलन करण्याचा इशारा अधिपरिचारिका संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
रुग्णालयामध्ये १०० टक्के पदभरती व बढती करण्यात यावी, केंद्र शासनाच्या निर्णयानुसार नर्सिंग भत्ता देण्यात यावा, कोविड संकटात आठवड्यात ३ दिवस रजा देण्यात यावी , केंद्र शासनाच्या निणर्यानुसार पदनाम बदल करणे, आरोग्य विभागाच्या सेवा प्रवेश नियमांमध्ये बदल करणे, कोरोना संक्रमणामुळे मृत्यूमुखी पडलेल्या अधिपरिचारिकेच्या कुटूंबाला ५० लाख रुपये वीमा सुरक्षा देणे, २००५ नंतर सेवेत रुजू झालेल्या अधिपरिचारिकांनां जुनी पेंशन लागू करुन सातव्या वेतन आयोगाची दुसरी व तिसरी किस्त तत्काळ जमा करावी, आदी मागण्यांसाठी बेमुदत आंदोलन करण्यात येत असल्याचे संघटनेच्या जिल्हाध्यक्ष मिनाक्षी बिसेन, उपाध्यक्ष नीलम शुक्ला, सचिव देवेंद्र खंडारे, पुजा घासले, प्रीतम कुंठेवार अक्षय मोरे, कार्तिक कडव, मंगला कुरवडे, पायल उईके, सचिन गढगे यांनी दिली आहे.